भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? महाराष्ट्रातील दिग्गज भाजप नेते पक्षाच्या हायकमांडवर नाराज?
राज्यातील नेत्यांना केंद्रीय नेतृत्वासोबत वन टू वन भेट न मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न निर्माण व्हावा अशा घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं नाही. यानंतर भाजपच्या गोटात निकाल जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून चलबिचल सुरु आहे. भाजपच्या गोटात अमाप घडामोडी घडताना दिसत आहेत. या घडामोडी चालूच राहणार आहेत. कारण आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महायुतीकडून आता वेळेआधी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवारही निश्चित होण्याची शक्यता आहे. असं असलं तरीही देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते सध्या दिल्लीत आहेत. या नेत्यांची नुकतीच काल पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. पण या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यातील नेत्यांना केंद्रीय नेतृत्वासोबत वन टू वन भेट न मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या पराभवाचे कारणे नेत्यांना व्यक्तिगत स्तरावर सांगायची होती. मात्र ते सांगता न आल्यामुळे नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे भाजप मुख्यालयात काल जवळपास 2 तास बैठक झाल्यानंतर देखील अनेक मुद्दे निकाली निघाले नाहीत. त्यामुळे भाजप नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिल्लीतल्या बैठकीत काय ठरलं?
महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची काल दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. संघटनमंत्री बीएल संतोष, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र विधानसभा भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे नेते देखील बैठकीत उपस्थित होते. तसेच या बैठकीत महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पियूष गोयल, मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे माध्यमांसमोर आले होते. त्यांनी बैठकीत लोकसभेच्या निकालावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच विधानसभेसाठी रोडमॅप ठरवण्यात आल्याची माहिती दिली.
हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला महत्त्वाच्या सूचना
दरम्यान, भाजपच्या कालच्या बैठकीत पक्षाच्या दिल्ली हायकमांडने महाराष्ट्र भाजपला महत्त्वाच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. “महाराष्ट्रात एकट्याच्या मर्जीने निर्णय होणार नाहीत, तर सामूहिक निर्णय व्हावेत, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी दिली. कोअर कमिटीला सोबत घेऊनच निर्णय घ्यावा आणि पक्ष चालवावा लागणार. कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला थांबवायचं असेल तर भाजपने एकत्रितपणे काम करायला हवं. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व जुन्या नेत्यांना सक्रिय करायला हवं. विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा. आत्तापासूनच उमेदवारांना तयारीच्या सूचना द्या. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा होऊ देऊ नका. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे, सोशल मीडियाचा अधिक वापर करा आणि विरोधकांना प्रत्युत्तर द्या”, अशा सूचना भाजपच्या हायकमांडने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिल्या.