सर्वात मोठी बातमी, काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर लढणार, सूत्रांची माहिती
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात इतर दोन पक्षांना किती जागा मिळणार? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून जाहीर झालेला नाही. भाजपकडून एकीकडे 20 उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तर महाविकास आघाडीकडून अद्याप लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उद्या मुंबई महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल आणि मग जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. असं असताना आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात काँग्रेस 18 जागांवर निवडणूक लढणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दिल्लीत आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा समावेश आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात 48 पैकी 18 जागांवर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागावाटपात पुन्हा पेच निर्माण होतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवार गट आणि ठाकरे गट 30 जागांवर लढणार?
काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची जवळपास पाऊण तास बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रात 18 जागांवर निवडणूक लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याने उरलेल्या 30 जागांचं गणित राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचं असणार आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
18 उमेदवारांमध्ये 2 महिलांचा समावेश
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या आजच्या बैठकीत 18 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी 18 जागांचे उमेदवारदेखील निश्चित करण्यात आले. या 18 उमेदवारांमध्ये 2 महिला उमेदवारांचा समावेश आहे. चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. इतर नावांची यादी कदाचित उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली जाऊ शकते. किंवा आज रात्री उशिरा काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते.