तुमचं नाव गुप्त ठेवू, फक्त… बीड पोलीसांचं नागरिकांना आवाहन काय ? पाच पथके कशासाठी?
मराठवाड्यातील बीड जिल्हा हिंसाचाराने पोळला होता. आता कुठे परिस्थिती सुधारत असून जनजीवन रुळावर येत आहे. या प्रकरणात 144 आरोपींना अटक झाली आहे. तर अनेक जण फरार आहेत.
महेंद्रकुमार मुधोळकर, बीड | 4 नोव्हेंबर 2023 : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागून लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाला जमावाकडून आगी लावण्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकाराच्या लोकप्रतिनिधींच्या घराला आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनामध्ये मास्टरमाईंड कोण आहे याचा छडा पोलिस लावत आहेत. बीड जिल्ह्यात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांममध्ये आता पोलिसांनी 144 आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. तर अनेक आरोपी फरार झाले आहेत. या घटनांमागे शिक्षण घेत असलेल्या तरूणाचा सहभाग असल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान पोलिसांना जनतेला आवाहन केले आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्हा हिंसाचाराने पोळला होता. आता कुठे परिस्थिती सुधारत असून जनजीवन रुळावर येत आहे. पोलीस हिंसाचारातील सहभागी तरुणाची ओळख पटवून त्यांना अटक करीत आहे. आतापर्यंत दगडफेक तसेच जाळपोळ प्रकरणात 144 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी बीड जिल्ह्यातील असून ग्रामीण भागातील आरोपींचा मोठा सहभाग आहे. या घटनेत आतापर्यंत 500 जणांची चौकशी करण्यात आली आहे. अनेक आरोपी शहरातून फरार झाले आहेत.
त्यांचे नाव गुप्त ठेवणार
बीडच्या जाळपोळ आणि दगडफेक आंदोलनामागचा मास्टरमाईंडचा सुगावा काढण्यात पोलीसांना यश आहे. हा मास्टरमाईंड बीडचाच असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके स्थापण करण्यात आली आहेत. आणि लवकरच मास्टरमाईंडला पकडण्यात पोलिसांना यश येईल. यातील आरोपीत शिक्षण घेणाऱ्या तरुणांचाही समावेश आहे. प्रकाश सोळंके यांची ऑडिओ क्लिप वायरल करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुंदर भोसले असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सुंदर भोसले याच्यावर जमावाला जाळपोळ करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, दगडफेक आणि जाळपोळ करताना अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शुट केले आहेत. या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना अशा क्लिप देऊन तपास करायला मदत करावी. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचा आरोप
बीड पोलीस निरपराध तरुणांना अटक करीत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. यातील मास्टरमाइंड बाजूला सोडून पोलीस दुसरे तरुण आरोपी म्हणून पुढे आणत आहेत. याची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिले आहे.