भाजप की राष्ट्रवादी, एकनाथ खडसे नेमके कोणत्या पक्षात? पाहा स्पेशल रिपोर्ट
प्रवेश होईपर्यंत राष्ट्रवादीनं राजीनामा न स्वीकारण्याची भूमिका राष्ट्रवादीनं घेतली. त्यामुळे अधिकृतरित्या प्रवेश किंवा सोडचिट्टी असं काही घडलंच नसल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.

Special Report On Eknath Khadse : भाजप प्रवेशाला पूर्णविराम देत आपण राष्ट्रवादी कधी सोडलीच नव्हती असा दावा एकनाथ खडसेंनी केल्यानंतर भाजपनं खडसेंना उत्तर दिलंय. खडसेंनी आता आहेत तिथं सुखी राहण्याचा सल्ला अतुल भातखळकरांनी दिला आहे. तर ही लाचारी असल्याची टीका गिरीश महाजनांनी केली आहे.
आपण राष्ट्रवादी सोडलीच नसल्यामुळे भाजपात अधिकृत प्रवेश झालाच नसल्याचा दावा करत एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काल जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळाव्यात खडसेंनी याबाबत भाष्य केलं. त्यावर आहे तिथंच सुखानं नांदण्याचा सल्ला भाजपनं खडसेंना दिला आहे.
खरोखर राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता का?
खडसेंचा खरोखर भाजपात प्रवेश झाला होता का? त्यांनी खरोखर राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता का? याबद्दल एप्रिल महिन्यात खडसे म्हणाले होते की भाजप हायकमांडसोबचं प्रवेशाचं ठरल्यानंतर आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. मात्र प्रवेश होईपर्यंत राष्ट्रवादीनं राजीनामा न स्वीकारण्याची भूमिका राष्ट्रवादीनं घेतली. त्यामुळे अधिकृतरित्या प्रवेश किंवा सोडचिट्टी असं काही घडलंच नसल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.
साधारण एप्रिल महिन्यात म्हणजे लोकसभेआधी खडसेंनी भाजपात पुन्हा प्रवेशाचं तयारी दर्शवली होती. मात्र हायकमांडने अद्याप आम्हाला कळवलं नसल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती. त्यावेळी गिरीश महाजनांनी मात्र खडसेंच्या घरवापसीला स्पष्ट विरोध केला. पुढे खडसेंच्या दाव्यानुसार एप्रिल महिन्यात होणारा प्रवेश लोकसभा निकाल लागेपर्यंतही होऊ शकला नाही. प्रवेश रोखण्यामागे फडणवीस आणि महाजन होते, असा आरोप करत खडसेंनी थेट मुलांची शपथ घेण्याचं आव्हान दिलं.
जळगावात भाजपची खेळी
यानंतर गेल्या आठवड्यात गणेशोत्सवानंतर खडसेंच्या प्रवेशाचा निर्णय होईल, असं सांगून फडणवीसांनी या वादावर उत्तर दिलं. पण विसर्जनाबरोबरच आपल्या भाजप प्रवेशाचा मुद्दाही विसर्जित झाल्याचं सांगत खडसेंनीच नकार दिला.
सध्या जळगावात भाजपनं लोकसभेदरम्यान जी खेळी केली, ती खेळी राष्ट्रवादीनं खडसेंचा राजीनामा न घेतल्यामुळे पूर्ण होऊ न शकल्याची चर्चा आहे. लोकसभेआधीच खडसेंनी भाजप प्रवेशाचं विधान केल्यामुळे मतदारसंघात संभ्रम तयार झाला होता. पण तरीही खडसेंची आमदारकी राष्ट्रवादीनं न काढल्यामुळे खडसेंची बाजू सुरक्षित राहिली.