Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’
अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना जाहीर झालाय. 14 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात डॉ. नाडकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तुम्हाला माहितंय स्वातंत्र्याचं तांबडं फुटलं तेव्हा त्यांनी रझाकाराविरुद्ध लढा दिला. तुम्हाला माहितंय त्यांनी शेवटपर्यंत धर्मापेक्षा माणूस प्यारा मानला. तुम्हाला माहितंय त्यांच्या वृत्तपत्रानं महाराष्ट्रात चक्क विरोधीपक्षाची भूमिका निभावली. तुम्हाला माहितंय त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवारांना व्यासपीठावर खडे बोल सुनावले. अनंतराव भालेरावांच्या स्मरणाची ही पणती आपल्याला जपून ठेवावी लागेल. कारण सभोवताली अंधार फार झालाय.
साल १९६३. बरोब्बर एक जूनची तारीख. ठिकाण अहमदनगर. मराठी पत्रकार परिषदेचं सोळावं अधिवेशन. अध्यक्षपदी अनंतराव भालेराव. अधिवेशनाचे उद्घाटक महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार. कन्नमवार नगरमध्ये पोचलेले. त्यांच्यापर्यंत अनंतरावांच्या भाषणाची प्रत पोचलेली. त्यांनी भाषण वाचलं. त्यांचा पारा चढला. अनंतरावांच्या भाषणातला काही मजकूर वगळला, तरच उद्घाटन कार्यक्रमाला येणार असं आयोजकांना कळवलं. अनंतरावांनी ही सूचना सपशेल झिडकारली. आयोजकांनी कसं तरी कन्नमवारांना राजी केलं. कार्यक्रम सुरू झाला. मुख्यमंत्री कन्नमवारांनी त्याकाळात छोट्या-छोट्या वृत्तपत्रांबद्दल ‘भिकार आणि रद्दीत भर टाकणारे’ असा उल्लेख एका भाषणात केलेला. अनंतरावांनी अध्यक्षीय भाषणातून मुख्यमंत्री कन्नमवारांच्या या प्रतिपादनाचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांसमोर ठणकावून नापसंती दर्शवली. ते इथंच थांबले नाहीत. तत्कालीन मराठी पत्रकार परिषदेचे चिटणीस राम निसळ यांनी ‘आझाद हिंद’ साप्ताहिकात एक लेख लिहलेला. त्यात आचार्य अत्रे यांच्या एका अग्रलेखावर टीका केलेली. तेव्हा आचार्य अत्रे यांनी निसळ यांचा बाप काढलेला. यावर अनंतरावांनी केलेलं विविचेनंही तितकच महत्त्वाचं. आज घडीला मीडियाची भाषा, वार्तांकन याची चर्चा सुरूय. यावर सर्वोच्च न्यायालयानं उघडपणं नाराजी व्यक्त केलेली आपण पाहिलंय. अनंतरावांचे तेव्हांचे बोल या परिस्थितीलाही आरासा दाखविणारे आहेत. अनंतराव भाषणात म्हणालेले, ‘वृत्तपत्र व्यवसायात अपप्रवृत्ती वाढत चालल्या आहेत. ज्यांची दानत शुद्ध आहे, हेतू संशयातित आहेत, निष्ठा शाबूत आहे अशांचाच समाजाला धाक वाटतो. म्हणून पत्रकारांनी सरकारी आचारसंहितेची वाट न पाहता आपल्या स्वत:साठीच आचारसंहिता तयार केली पाहिजे.’ जणू त्यांना माध्यमांचं भविष्य डोळ्यांसमोर दिसू लागलेलं. आ. कृ. वाघमारे यांनी रेल्वेतली नोकरी सोडून फक्त समाजकार्याखातर चालविलेला ‘मराठवाडा’ अनंतरावांकडे सुपूर्द केला. तिथून मराठवाड्यानं एक वृत्तपत्र नव्हे, तर विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. तटस्थ, नि:पक्षपाती, जागल्याची भूमिका निभावली. अनंतरावांच्या निधनानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’चे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकर यांनी ‘मराठवाडा’सारख्या प्रादेशिक वृत्तपत्राची तुलना थेट ‘मॅन्चेस्टर गार्डियन’शी केली. त्या पत्रानं इंग्लंडच नव्हे जगभरात आदराचं स्थान मिळवलेलं.
वैजापूर तालुक्यातलं खंडाळा. अनंतरावाचं गाव. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1919 आणि मृत्यू 26 ऑक्टोबर 1991 चा. खंडाळ्याचं कुलकर्णीपण त्यांच्या वडिलांकडं. काशीनाथबुवा वारकरी. एक अधिकारी बुवांना म्हणाला, ‘तुमचा वारीत खूप वेळ जातो. ते करणं सोडा. कामात लक्ष द्या.’ तेव्हा त्यांनी काय केलं, तर सगळ्या दप्तराचा बाडबिस्तारा तहसील कार्यालयात पोच केला. अनंतरावांची पुढची वाटचाल मार्क्सवादी, निरीश्वरवादी. मात्र, वारकरी पंथांचा त्यांना कायम आदर वाटत आला. त्यांची मुळं अशी खोल कुठं तरी मनातल्या पंढरीत रुजलेली. काशीनाथबुवांनी काही काळ रोटेगाव रेल्वेस्टेशनच्या जीनिंग फॅक्टरीवर व्यवस्थापक म्हणून काम केलं. तिथं वर्षभर पायपीट करत अनंतरावाचं आबाजी मास्तरांच्या शाळेत शिक्षण झालं. सातवीपर्यंतचं शिक्षण गंगापूरच्या आत्याकडं. सातवीनंतरच्या पुढच्या शिक्षणासाठी औरंगाबादला आले. धावणी मोहल्ल्यात खोली करून रहायचे. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतमध्ये राज्यात पहिले आले. त्याकाळी पंधरा रुपयांची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. पुढच्या शिक्षणाचा आर्थिक मार्ग त्यामुळं सुकर झाला. त्यानंतर औरंगाबादमध्येच इंटमिजिएट कॉलेजात इंटरच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. इथून त्यांचं वाचन सुरू झालं. याच काळात ते गोविंदभाई श्रॉफ यांच्या संपर्कात आले. ते आपल्या घरात विद्यार्थ्यांचे वर्ग घेत. गोविंदभाईंच्या खोलीत भिंतीवर मार्क्स, लेनिन टांगलेला. कम्युनिस्ट, काँग्रेस, गांधीवाद यांचे धडे ते विद्यार्थ्यांना देत. अनंतरावांनी इथूनच निस्पृह राजकारण, समाजकारण, स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला वाहून घेतलं.
1935 चा कायदा आला. मुंबई, मद्रास राज्यात लोकनियुक्त सरकार आलेली. हैदराबादच्या निजामानं याचा धसका घेतला. राजकीय संघटना स्थापन करण्यावर मनाई केली. भाषण, लिखाण यावर बंधनं घातली. हिंदूंचं धार्मिक स्वातंत्र्य हिरावलेलं. त्यांची जबरदस्तीनं धर्मांतरं सुरू असलेली. फक्त राज्यकारभासाठी मुस्लीम वाढवायचे, हेच एकमेव धोरण. याच अन्यायाविरोधात सत्याग्रहाचा विचार बळकट होत गेला. हैदराबाद स्टेट काँग्रेस संघटना स्थापन होण्याला फक्त एक दिवस राहिलेला. निजाम सरकारनं या स्थापन न झालेल्या संघटनेवर बंदी आणली. त्यानंतरही हैदराबादेत सत्याग्रह झाला. पहिल्या तुकडीचं नेतृत्व परभणीचे अॅड. गोविंदराव नानल यांनी केलं. दुसऱ्या तुकडीचं स्वामी रामानंद तीर्थ यांनी. मराठवाड्यात असा सत्याग्रह करण्याचा निर्धार झाला. गोविंदभाईसह इतरांनी सत्याग्रहींची नोंदणी सुरू केली. मात्र, ऐनवेळी नावं नोंदविलेल्यांनी पाठ फिरवली. तेव्हा 18 वर्षांच्या अनंतरावांनी पुढाकार घेतला. भीमराव सोनदे, रघुनाथ भालेराव या मित्रांसोबत सत्याग्रहींची पहिली तुकडी केली. वैजापुरातल्या महादेव मंदिरात हा सत्याग्रह झाला. ‘वंदे मातरम्’चा जयजयकार घुमला. मंदिर ते बाजारापर्यंत तरुण आंदोलक घोषणा देत गेले. पोलिस आले. त्यांना काय करावं कळेना. शेवटी अनंतरावांनी आम्हाला पकडा असं सांगितलं. त्यांनी ठाण्यात नेऊन यांच्यावर हात धुवून घेतला, ही गोष्ट वेगळीच. वैजापूर कोर्टात खटला चालला. अनंतराव, त्यांच्या मित्रांना दोन महिन्यांची सक्तमजुरी आणि शंभर रुपयांचा दंड झाला. दंड भरायला पैसे नव्हतेच. तिघंही तीन-तीन महिन्यांची शिक्षा भोगूनच बाहेर पडले. इथून सुरू झालेलं अनंतरावाचं स्वातंत्र्यलढातलं काम, समाजकारण, राजकारण शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहिलं.
महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. साल 1945-46. अनंतरावांकडं नांदेड जिल्हा संघटकाची जबाबदारी. श्यामराव बोधनकर तिथलं बढं प्रस्थ. त्यांचे सराफी पेढ्यांसह इतर अनेक व्यवसाय. मात्र, स्वातंत्र्यलढ्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं. महाराष्ट्र परिषदेमागे ते खंबीर उभे. स्वातंत्र्याचं तांबडं फुटलेलं. निजामाला सत्ता जीव की प्राण. त्याला भारतात सामील न होता स्वतंत्र रहायचं होतं. जनतेत भीती रहावी म्हणून इत्तेहादुल मुस्लिमीन या कडव्या संघटनेला उत्तेजन दिलं जात होतं. या संघटनेच्या ‘रझाकार’ नावाच्या कुप्रसिद्ध स्वयंसेवकांचा रोज अत्याचार सुरू होता. याच काळात मुधोळ तालुक्याचे संघटक गोविंदराव पानसरे यांनी एक भाषण केलेलं. सरकारला ते आक्षेपार्ह वाटलं. त्याप्रकरणी बिलोली न्यायालयात खटला गुदरलेला. पानसरेंना जामीन मिळाला. ते बैलगाडीतून गावी निघाले. रझाकारांनी त्यांना अर्धापूरजवळ अडवलं. तलवारीनं त्यांचे तुकडे-तुकडे केले. सर्वत्र संतापाची लाट उसळली. पानसऱ्यांचा खून सोमवारी झालेला. दर सोमवारी खून झालेल्या ठिकाणी मोठी यात्रा भरू लागली. 6 जानेवारी 1947. पानसरेंचा पहिला स्मृतिदिन होता. त्यासाठी 25 हजार लोक जमलेले. सभेला परवानगी नव्हती. काँग्रेसनं सभा घेण्याचा निर्धार केलेला. त्यामुळे बिलोलीचा फौजदार झैदी. तो 20 सशस्त्र पोलिसांना घेऊन आला. त्यानं सभा होऊ न देण्याचा पण केलेला. सभा सुरू झाली. तितक्यात झैदी पोलिस गाडी घेऊन आला. त्यानं सभा सुरू झालेली पाहिली. गोळीबाराचा हुकूम सोडला. 3 जण जागीच ठार झाले. पळापळी सुरू झाली. काही जण जखमी झाले. शांतेतत सुरू असणाऱ्या कार्यक्रमावर अत्याचाराचा वरवंटा फिरवल्यामुळं लोक संतापले. जमावानं पोलिसांना घेरलं. झैदी आणि त्याचे वीसेक पोलिसांची खैर नव्हती. जमाव आक्रमक झालेला. मात्र, अनंतराव आणि त्यांचे साथी पुढे धावले. हजारो लोकांना पोटतिडकीनं आवरलं. झैदीसह पोलिसांचे प्राण वाचवले. अनंतराव असेच.
देशाला स्वातंत्र्य मिळालेलं. त्यानंतरही हैदराबादचा निजाम भारतात सहभागी न होता स्वतंत्र रहायला आडून होता. हैदराबाद संस्थानातील जनतेला आता स्वातंत्र्य हवं असलेलं. या मागणीला पाठिंबा मिळू नये म्हणून संस्थानात निजाम सरकारच्या आशीर्वादानं गुंडगिरी सुरू झाली. केवळ मुस्लिमांनाच राज्य करण्याचा अधिकार आहे, असा सिद्धांत मांडणारा इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष निजाम सरकारमुळं आपली पाळंमुळं घट्ट करत होता. रझाकारांनी कितीही अत्याचार केले, तर त्याकडं निजाम सरकारचं दुर्लक्ष सुरू होतं. हैदराबादजवळचं बीबीनगर रेल्वेस्टेशन, कर्नाटकातली बीदरची बाजारपेठ रझाकारांनी जाळलेली. गोरठे आणि लोह्यात ट्रक भरून आलेल्या रझाकारांनी जाळपोळ करून अनेकांच्या हत्या केल्या. परिस्थिती भयंकर होती. देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात मग्न. मात्र, हैदराबाद संस्थानात रक्ताची होळी खेळली जात होत. या अत्याचाराला कंटाळून 9 ऑगस्ट रोजी सार्वजनिक जागी तिरंगा फडकावण्याचा निर्धार झालेला. नांदेड जिल्हा स्वातंत्र्यसैनिकांचा. तसेच इथे इत्तेहादुल मुस्लिमीन आणि रझाकारांचेही वर्चस्व. ज्या दिवशी तिरंगा फडकावला जाणार होता, त्या दिवशी नेमकी ईद. ईदच्या निमित्तानं मोठी मिरवणूक काढायाची आणि दंगल घडवायची असा कट रझाकारांनी केलेला. या स्फोटक परिस्थितीची कुणकुण काँग्रेस नेत्यांना लागली. अनंतरावांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. परिस्थिती गंभीर होती. दंगल टाळायची यासाठी अनंतराव, श्यामराव बोधनकर, भगवानराव गांजवे यांनी प्रयत्न सुरू केले. तेव्हाचा कलेक्टर अखलाख हुसेन कडवट रझाकारांपेक्षा समजूतदार. जणू दगडापेक्षा वीट मऊ. त्यांनी ईदची मिरवणूक होईपर्यंत तिरंगा उभारू नका, असं सांगितलं. मात्र, स्वातंत्र्याचं वारंच इतकं बेफाम होतं, की ते शक्य नव्हतं. शेवटी अखलाख हुसेन स्वत:काँग्रेस कार्यालयात आले. ईदची मिरवणूक आली. तेव्हा अखलाख यांनी स्वत:ची शेरवानी काढली. काँग्रेस कार्यालयावर उभारलेला तिरंगा झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, रझाकार आक्रमक झाले. त्यांनी काँग्रेस कार्यालय घेरलं. अनंतराव, श्यामराव बोधनकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मुश्कीलनं आवरलं. होणारी दंगल टळली. अन्यथा पुन्हा प्रेताचे खच पडले असते. अनंतराव असेच.
निजामाच्या राज्यात शिंदीची झाडं तोडायला मनाई. या झाडांच्या कंत्राटातून सरकार मोठा महसूल वसूल करी. हे मद्य त्याकाळी तुफान विकलं जाई. अनंतरावांसह सहकाऱ्यांनी जंगल सत्याग्रह पुकारलेला. पाटनूरजवळचा अपरंपाराचा माळ. इथं जवळपास आठेक हजार शेतकरी कुऱ्हाडी घेऊन साग, शिंदीची झाडे तोडायला पोहचलेली. त्यांना अनंतरावांसह नेत्यांनी सत्याग्रह का करतोय, हे सांगितलं. भारतमातेच्या घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर झाडावर कुऱ्हाडीचे घाव सपासप पडू लागले. पोलिसांना याची खबर लागली. एक गाडी या ठिकाणी आली. फौजदारासह मोजून 12 पोलिस. सत्याग्रहींनी त्यांना घेरलं. अनंतरावांच्या ते लक्षात आलं. ते तडफेनं पुढं सरकले. त्यांच्या लेखी पोलिसांची हत्या करणं सत्याग्रह नव्हताच. पोलिसांनी रडणं सुरू केलं. तेव्हा अनंतराव सत्याग्रहींना म्हणाले, ‘याद राखा, पुढे याल तर…’ पोलिसांनी शस्त्र टाकली. त्यांची वर्दी उतरवण्यात आली. एका पोलिसाच्या खांद्यावर तिरंगा ध्वज देण्यात आला. पोलिसांना झेंड्याला सलामी द्यायला लावली. सात हजार लोकांसमोरून पोलिस खाली मान घालून निघून गेले. अनंतराव नसते तर…अनंतरावांनी धर्मांध रझाकाराविरुद्ध लढा दिला, पण त्या परिस्थितीतही ते कधीही स्वत: धर्माच्या आहारी गेले नाहीत. त्यांना शेवटपर्यंत धर्मापेक्षा माणूस प्यारा राहिला. असे होते अनंतराव. (Special report on the work of freedom fighter, fearless editor Anantrao Bhalerao)
इतर बातम्याः
‘कवच कुंडल’ विरुद्ध ‘हर घर दस्तक’; कोणती लसीकरण मोहीम राबवायची, राज्यातले आरोग्य कर्मचारी पेचात!
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021