Special Report : ‘संतोष माने का घडला? विचार करावा लागेल’, एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि प्रशासनाची मोगलाई, वाचा सविस्तर

तुटपुंज्या पगारात भागणं किंवा भागवणं कधीही शक्य नाही. आता 28 टक्के महागाई भत्ता, आणि घरभाडे वाढवून आमचे प्रश्न सुटतील का? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. किंबहुना राज्य सरकारकडून आमची बोळवण सुरु असल्याची खंत एसटीच्या चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जातेय.

Special Report : 'संतोष माने का घडला? विचार करावा लागेल', एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि प्रशासनाची मोगलाई, वाचा सविस्तर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 12:03 PM

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या न्याय मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला. अशावेळी एसटी कर्मचारी सातत्यानं सामान्य प्रवाशांना का वेठीस धरत असतील? असा प्रश्न विचारला जातो. पण एसटी कर्मचाऱ्यांकडे कुणी माणूस म्हणून पाहतं का? आम्हालाही कुटुंब आहे, आमच्याही काही गरजा आहेत. ज्या तुटपुंज्या पगारात भागणं किंवा भागवणं कधीही शक्य नाही. आता 28 टक्के महागाई भत्ता, आणि घरभाडे वाढवून आमचे प्रश्न सुटतील का? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. किंबहुना राज्य सरकारकडून आमची बोळवण सुरु असल्याची खंत एसटीच्या चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. (Problems and of injustice against ST employees in Maharashtra)

राज्यात गेल्या काही दिवसांत जवळपास 29 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आपल्या बापाची अवस्था पाहून मरणं पसंत केलं. सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारात सच्चिदानंद पुरी यांनीही झाडावर गळफास लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने त्यांचे प्राण वाचले. मात्र, त्यांच्यावर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ का आली? असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलेलं एसटी महामंडळातील वास्तव अतिशय धक्कादायक आहे.

सच्चिदानंद पुरी यांच्या मनात आत्महत्येचा विचार का आला?

कळंब आगारात मी गेली 14 वर्षे काम करतोय. गेल्या काही दिवसांपासून चालक आणि वाहकांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. आत्महत्येचं सत्र वाढत गेल्यानं माझं मनोबल खचलं. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण ही आमची प्रमुख मागणी आहे. मात्र, नेमका तोच मुद्दा बाजूला करुन आम्हाच्या माथी काय मारलं जातंय? आम्हाला संघटना मान्य नसल्यानं आम्ही संयुक्त कृती समिती तयार केली. त्यातही पुन्हा तेच लोक आहे. चालक-वाहकांच्या मानगुटीवर पाय देण्याचं काम त्यांनी केलं. सरकारमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा असताना फक्त महागाई भत्ता आणि घरभाड्यावर आमची बोळवण करण्यात आली.

29 ऑक्टोबरला पहाडे तीन वाजता ठरलं की आगार बंद करायचं. साडे पाच वाजता पूर्ण आगार बंद झालं. पूर्ण एक दिवस संप यशस्वी झाला. पण काहींना या संपातील सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचं वर्चस्व पसंत पडलं नाही. त्यामुळे दमदाटी करुन, धमक्या देऊन गाड्या सुरु करायला लावल्या. हे पाहून मानसिकरित्या खचलो आणि आत्महत्येच्या विचार डोक्यात आला. आज प्रशासकीय अधिकारी आणि एसटीतील पुढाऱ्यांमुळे चालक-वाहकांवर फासावर लटकण्याची वेळ आली आहे.

‘आम्हाला आमच्या लायकीप्रमाणे द्या, पण किमान जगण्यापुरतं तरी द्या’

दिवाळीसारख्या सणाला बस बंद करुन सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड करणे हा उद्देश नाही. पण आमच्या पोटात भाकरी नाही तर आम्ही काम कसं करणार? आम्हाला बहिणी नाहीत का? त्यांना दिवाळीत आम्ही काही द्यायचं नाही का? आम्हाला स्वत:चं घर बांधायचं नाही का? आमच्या लेकरा-बाळांनी शिकून अधिकारी व्हावं असं आम्हाला वाटत नाही का? आज 17 वर्षे झाली एसटीमध्ये काम करतोय. पण माझा पगार 23 हजार रुपये आहे. त्यातूनही हातात येणारा पगार सांगायलाही आम्हाला लाज वाटते. मग सांगा आम्ही काय करावं? आम्हाला आमच्या लायकीप्रमाणे द्या, पण किमान जगण्यापुरतं तरी द्या, अशा शब्दात सच्चिदानंद पुरी यांनी आपली व्यथा आमच्यासमोर मांडली. (Problems and of injustice against ST employees in Maharashtra)

अनंत पवरे, चालक, शिवाजीनगर डेपो, पुणे

एसटीमध्ये काम करत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा काहीसा अभ्यास असणारे अनंत पवरे यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो, तेव्हा एसटी महामंडळातील दाहकता अधिक प्रकर्षाने समोर आली. एसटीमध्ये नवीन लागलेल्या अनेक मुलांची अवस्था अशी आहे की, आई-वडील आजारी किंवा वृद्ध आहेत. बहिण लग्नाची आहे. त्यात तुटपुंजा पगार, मग अशावेळी त्याने कुटुंबाचा भार कसा उचलावा व स्वत:च्या लग्नाचा विचार तरी  कसा करावा? असा सवाल त्यांनी केलाय.

एसटीमध्ये परिपत्रक हा महत्वाचा घटक आहे. या परिपत्रकानुसारच सर्व बाबी किंवा सोपस्कार पार पाडले जावे असं अपेक्षित असतं. मात्र, कामगारावर काही लागू करायचं झाल्यास परिपत्रक दाखवलं जातं आणि कामगार जेव्हा एखादी गोष्टी सांगतो किंवा मागतो तेव्हा परिपत्रक कुठे गायब होतं कळत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिस्त आणि आवेदन कार्य पद्धती, हाच मुळात एसची कर्मचाऱ्यांवरील सर्वात मोठा अन्याय आहे. उदाहरण म्हणून सांगतो की, मी एक चालक आहे. तुम्ही माझ्या गाडीतील प्रवासी आहात. तुम्ही विनंती केली की मला या-या ठिकाणी सोडा. तेव्हा मी सांगतो की हा आमचा स्टॉप नाही. तेव्हा तुम्ही सुशिक्षित असता. तुम्ही एक मेल करता. त्या मेलवरुन आमच्यावर कारवाई होते. अधिकाऱ्यांकडून आमची पगारवाढ दोन वर्षासाठी रोखली जाते. उलटपक्षी तुमच्या विनंतीवरुन स्टॉप नसलेल्या ठिकाणी आम्ही गाडी थांबवली आणि मागून एखादी गाडी येऊन धडकली तरीही कारवाई ही आमच्यावरच होते. एसटीमध्ये अधिकाऱ्यांना दंड होतो तो 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत. पण चालक किंवा वाहकाच्या दंडाची सुरुवात ही 500 रुपयांच्या पुढे होते. शक्यतो अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. पण कर्मचाऱ्यांचा बेसिक हा थेट तीन टक्क्यानं खाली आणला जातो, हे दाहक वास्तव पवरे यांनी सांगितलं.

एसटी कर्मचारी घाबरुन का राहतो?

एसटी कर्मचारी एवढा घाबरुन का राहतो तर त्याचं बेसिक समाधानकारक वाढायला किमान 10 वर्षाचा काळ जातो. जर मी एखाद्या अधिकाऱ्याच्या घरी पाणी भरलं नाही आणि त्याने ठरवलं की माझी वाट लावायची तर मी कितीही पुरावे गोळा केले तरीही मी शिक्षेस पात्र ठरतो. कारण म्हणजे मी वर सांगितल्याप्रमाणे शिस्त व आदेवन कार्यपद्धती. माझा भाऊ मनोरुग्ण होता. आई-वडील वृद्ध होते. मी वारंवार बदलीसाठी अर्ज केला, तो मान्यही झाला. पण अद्याप माझी बदली झालेली नाही. शेवटी गेल्या काही वर्षापासून माझा भाऊ बेपत्ता झाला. वडील नुकतेच वारले. आता आई आहे, त्यामुळे नोकरी सोडावी की काय करावं, असा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे.

‘संतोष माने का घडला? विचार होणं गरजेचं’

संतोष माने याने केलेल्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण संतोष माने का घडला? संतोष माने घडण्यामागे कोणती व्यवस्था कारणीभूत आहे? याचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे. क्षणाक्षणाला मरणं ज्याला म्हणतात ते आम्ही भोगत आहोत. इंग्रजांचा अन्याय, मोगलाई, निजामशाही जी काही असेल ती आम्ही आज भोगत आहोत. आता माझं दुखणं मी घरी सांगू शकत नाही. बायको-लेकरांना सांगू शकत नाही. पण या व्यवस्थेमुळं आमच्यावर रोज रडण्याची वेळ येते, अशी खंत पवरे यांनी बोलू दाखवली. (Problems and of injustice against ST employees in Maharashtra)

रत्नाकर जोशी, एसटी चालक

एसटी कर्मचाऱ्याची पहिली अडचण म्हणजे तुटपुंजा पगार आहे. त्यानंतर सुलतानी प्रशासन, वाहनं व्यवस्थित नाहीत. अधिकारी कर्मचाऱ्याला कायम नोकराच्या भूमिकेतून पाहतो. त्यामुळे आज एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण हाच एकमेव पर्याय आहे. ते झाल्यास आम्हाला बाकी सर्व काही मिळेल. आज 22 – 23 वर्षाची सेवा करणाऱ्या एसटीच्या चालकाला 30 हजाराच्या आसपास पगार मिळतो. मग त्याने कुटुंब चालवायचं कसं? आई-वडिलांना सांभाळायचं कसं? मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं कसं? याचं उत्तर राज्य सरकारनेच द्यावं, असं मत रत्नाकर जोशी या एसटीच्या चालकांनी माडलं आहे.

पांडुरंग सुरवसे, एसटी वाहक

पांडुरंग सुरवसे हा अत्यंत साधारण कुटुंबातील तरुण मार्च 2017 मध्ये एसटीत वाहक म्हणून रुजू झाला. आज त्याचा पगार 15 हजार रुपये आहे. त्याने सांगितल्यानुसार पीएफ दीड हजार, फेस्टिव्हल एक हजार, एसटी बँकेच्या कर्जाचा हप्ता साडे सात हजार आणि इतर मिळून साधारण 10 हजार 500 रुपये त्याचा महिना जातो. हाती उरतात फक्त साडे चार हजार रुपये. घरी आई-वडील, बायको, एक मुलगा. त्यात वडील आणि लेकराचा दवाखान्याचा खर्च. अशावेळी कुटुंब चालवायचं तरी कसं? असा सवाल त्याने विचारला. कमी पगार असल्यामुळे कोणतीही बँक एसटीतील चालक किंवा वाहकाला कर्ज देत नाही. नाईलाजानं एसटी बँकेचं कर्ज घ्यावं लागतं. आज माझ्यासारखे एसटीतील 70 टक्के कर्मचारी कर्जबाजारी आहेत. कमी पगार आणि अधिकारी वर्गाचा जाच यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर गळफास लावून घेण्याची वेळ येते. संपाच्या काळात आत्महत्या सुरुच आहेच, दुर्देवाने पुढेही होत राहतील. पण या ढिम्म प्रशासनाला आणि सरकारला जाग कधी येणार? असा प्रश्न त्याने केला. त्यावेळी तो भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

सतीश सुरवसे, एसटी चालक

सतीश सुरवसे यांनी सांगितलं की, आज मला 10 वर्षे झाली एसटीमध्ये. माझा पगार 14 हजार रुपये आहे. सर्व कट होऊन हातात चार ते पाच हजार येतात. एसटी बँकेचं कर्ज आहे. घरात आई-वडील, दोन भाऊ, 2 मुलं, बायको असं कुटुंब आहे. पगार हाती आल्यानंतर महिनादेखील कडेला जात नाही. 12 ते 15 दिवस घर कसं तरी चालतं. पुढचे 15 दिवस कसं भागवायचं असा प्रश्न आम्हा एसटीतील कर्मचाऱ्यांना कायम पडलेला असतो.

इतर बातम्या :

‘इंधन दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खाच्या बातम्यांवर जोर’, सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार

मुस्लिम आरक्षणासाठी 27 नोव्हेंबरला ‘चलो मुंबई’, खासदार इम्तियाज जलील यांचं आवाहन

Problems and of injustice against ST employees in Maharashtra

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.