हायवेवर बेफाम धावणाऱ्या वाहनांवर अंकुश, राज्यभरात 187 ठिकाणी स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल तैनात
राज्य सरकार महामार्गांवर बेफामपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना जोरदार दणका देण्याच्या तयारीत आहे. आता निर्धारित वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर अंकूश ठेवण्यासाठी राज्याचा परिवहन विभाग 187 स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल खरेदी करणार आहे.
मुंबई | 10 जानेवारी 2023 : राज्यातील वाढत्या वाहन अपघाती मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील महामार्गांवर वाहनांचा वेग प्रचंड ठेवल्याने अपघाती मृत्यूत भर पडत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने यावर उपाययोजना करण्याची ठरविले आहे. नमूद केलेल्या वेगापेक्षा वाहनांचा वेग अधिक ठेवल्याने वाहनांचे नियंत्रण गमावल्याने अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे अशा बेफाम वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणयासाठी परिवहन विभागाने राज्यभरात तब्बल 187 ठिकाणी स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून वाहने वेगाने हाकणाऱ्या चालकांवर अंकुश बसणार आहे.
राज्यातील वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आधुनिक वाहनांचा वेग जास्त असल्याने त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील प्रचंड वाढले आहे. 90 टक्के वाहन अपघात हे मानवी चुकांमुळेच होत आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग जादा असल्याने देखील अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. परिवहन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वाहनांच्या वेगाला लगाम लावण्यासाठी 187 स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल खरेदी केल्या जाणार आहेत. या स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल महामार्गांवर जागोजागी तैनात केल्या जाणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगावर पाळत ठेवणे शक्य होणार आहे.
वाहनांच्या आत असणार स्पीड गन
मुंबई ते पुणे एक्सप्रेस हायवे वर अपघातांची संख्या वाढली आहे. या अपघाताचे विश्लेषण केले असता वाहनांचा वेग देखील अपघातांना जबाबदार ठरत आहे. वाहनांच्या वेगावा लगाम घालण्यासाठी परिवहन विभागाने 187 स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांच्या आत स्पीड मॉनिटर करणारी यंत्रणा तैनात असणार आहे. मार्च महिन्याअखेर ही यंत्रणा केली जाणार आहे. यासाठी 57 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. केंद्र सरकारच्या स्कीम फॉर स्पेशल असिस्टंस टू स्टेट फॉर पॅपिटल इन्व्हेस्टमेंट अंतर्गत केला जाणार आहे. या स्पीड गन कॅमेरा स्टेट कंट्रोल रूमला जोडला जाणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ‘स्पीड गन इंटरसेप्टर व्हेईकल’ तैनात केली जाईल तेथून निर्धारित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांची माहिती कंट्रोल रूमला तत्काळ मिळणार असून त्या वाहनाला दंड आकारला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.