पगार आम्ही देऊ पण मुलांची फी कमी करा; खासगी महाविद्यालयांना प्राध्यापकांच्या बड्या पगारावरुन चंद्रकांत पाटलांनी फटकारलं
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाची फी 84 हजार रुपये आहे. तर, खासगी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून 22 लाख फी घेतली जाते.
मुंबई : खासगी संस्थांमार्फत भरमसाट फी घेतली जात असल्याचे विद्यार्थ्यांचे शिक्षण महागले आहे. याला प्राध्यापकांचा पगार जबाबदार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(State Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी प्राध्यापकांच्या बड्या पगारावरुन खासगी महाविद्यालयांना चांगलच फटकारलं आहे. प्राध्यापकांचे पगार आम्ही देऊ पण मुलांची फी कमी करा असे निर्देशच्य त्यांनी महाविद्यालयांना दिले आहेत.
महाविद्यालयांकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाठ फी मुळे शिक्षण महागले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे काही जणांसाठीच मर्यादित राहत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण सगळ्यांपर्यत पोचविण्यासाठी शिक्षण स्वस्त होणे गरजेचे असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांची फी कमी व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्य सरकार खासगी महाविद्यालये, संस्थांमधील प्राध्यापकांच्या वेतनाची जबाबदारी घेईल, महाविद्यालयांनी शुल्क कमी करावे, अशी भूमिका राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
उच्च शिक्षणात 12 हजार कोटी रुपये प्राध्यापकांच्या पगारावर खर्च होतात. खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या वेतनासाठी त्यात आणखी हजार कोटी रुपये लागतील. तेही उपलब्ध करून दिले जातील पण फी कमी झाली पाहिजे.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाची फी 84 हजार रुपये आहे. तर, खासगी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून 22 लाख फी घेतली जाते. प्राध्यापकांचे वेतन जास्त असल्याने ही जादा फी आकारली जात असल्याचे कारण खासगी महाविद्यालयांकडून देण्यात येते.
सगळ्या खाजगी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे पगार करायचे झाले तर हजार कोटी वाढतील. 12000 कोटी खर्च करतोय तर 13000 कोटी खर्च करावे लागतील. मग खाजगी कॉलेजला फी कमी करावी लागेल.
आता शुल्क नियमन प्राधिकरणाने शुल्क मान्य केलेल्या महाविद्यालयांपैकी 10 टक्के महाविद्यालयांना भेटी देऊन प्रत्यक्ष खर्चाची पाहणी करणार असल्याचेही पाटील यांनी सांगीतले.
शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार हे पाप आहे असं म्हणत त्यांनी शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले. आता देशात भुकेने कोणी मरत नाही पण आता शिक्षणावर काम करण्याची गरज आहे. आम्ही स्वस्त आणि मस्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय असेही ते म्हणाले.