मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे हा पुतळा कोसळल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी अनावरण झालेला हा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरून शिवप्रेमी आणि विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. पुतळ्यावरून राज्यातील राजकारण तापलं असतानाच हे पुतळे नेमके कशासाठी, त्यांना इतकं महत्त्व का आहे आणि पुतळे उभारण्यासाठी कोणकोणते निकष पाळावे लागतात, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात..
भविष्याकडे वाटचाल करताना आपल्या भूतकाळाला म्हणजेच इतिहासाला विसरून चालत नाही. पुतळा हा इतिहास आणि संस्कृतीचं स्मरण म्हणून ओळखला जातो. पुतळे समाजात प्रतिकांचंच काम करतात. कोणाकडे सत्ता होती किंवा आहे, इतिहासात काय घडलं होतं हे पुतळ्यांच्या रुपात आपल्यापुढे येतं. आपण त्यांना महत्त्व देतो कारण त्यांच्यात आपण स्वत:ला आणि आपल्या इतिहासाकडे पाहतो. पुतळे हे ऐतिहासिक घटना आणि आकृत्यांचं मूर्त स्मरणपत्र म्हणून काम करतात. भविष्यातील पिढ्यांसाठी आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यात मदत करतात. स्मारक आणि पुतळ्यांमध्ये जनतेला प्रेरणा देण्याची, मानवतेची आणि समाज म्हणून आपल्याला एकत्र बांधून ठेवणाऱ्या मूल्यांची आठवण करून देण्याची शक्तीदेखील असते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेकडो पुतळे देशात पाहायला मिळतात. त्यापाठी अशा आदर्श व्यक्तींचा इतिहास, प्रेरणा आताच्या पिढीला मिळावी असा उद्देश असतो.
राज्यात कुठेही एखाद्या थोर व्यक्तीचा किंवा राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारायचा असेल तर राज्य सरकारच्या निकषांची पूर्तता करणं बंधनकारक आहे. सरकारच्या या अटी पूर्ण केल्यावरच त्यानुसार संबंधित भागाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार असतात. पुतळे उभारण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. 2017 मध्ये सरकारने मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय जारी केला. राज्यात कुठेही पुतळा उभारायचा असेल तर त्यासाठी आधी राज्य सरकारकडे विचारणा करावी लागते. सरकारच्या परवागनीशिवाय कोणताच पुतळा उभारता येत नाही. त्याचप्रमाणे पुतळे उभारण्यासाठी परवानगी मागणाऱ्या संस्था नोंदणीकृत असणं आवश्यक आहे.
कोणत्याही संरचनेवर आधारित काम सुरू होण्याआधी त्यासाठी संरचना सल्लागारांकडून परवागनी घ्यावी लागते. त्या संरचनेचा पाया कसा असावा, त्यात कोणी साधनसामग्री वापरली जावी, त्यात असणाऱ्या घटकांमुळे किती गतीच्या वारा-वादळांपासून सुरक्षा मिळेल, जर ती संरचना समुद्रकिनारी असेल तर खाऱ्या वाऱ्यांना तोंड देईल अशी सामग्री त्यात आहे का, यांसारखे अनेक मुद्दे विचारात घेतले जातात. इतकंच नव्हे तर संरचना सल्लागाराने दिलेल्या मंजुरीप्रमाणे काम होतंय की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्या कामाच्या कंत्राटदाराची आणि त्यात नेमलेल्या पर्यवेक्षकाची असते. कंत्राटदाराला संरचना सल्लागाराला किंवा त्याच्या प्रतिनिधीला बोलावून झालेल्या कामाची मंजुरी घ्यावी लागते. आपल्या मंजुरीप्रमाणे काम सुरू नसेल तर संरचना सल्लागार किंवा त्याने नेमलेला प्रतिनिधी हे काम थांबवूही शकतो. बांधकाम व्यवसायात असणाऱ्यांना हे सर्व माहीत असतं.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष झालं असल्याची शक्यता ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी व्यक्त केली. या पुतळ्याची उभारणी करताना स्थापत्यरचनेच्या नियमांचं पालन झालं होतं की नाही, याची चौकशी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. “जेव्हा एखादा पुतळा 15 फुटांपेक्षा जास्त उंच असतो, तेव्हा शिल्पकारासोबतच तज्ज्ञ अभियंत्याचं कामही जास्त महत्त्वाचं असतं. पुतळ्याचे लोखंडी रॉड उत्तम दर्जाचे असावेत. त्याची उंची जितकी जास्त तितका जमिनीखालचा पाया भक्कम असावा लागतो. कोणताही पुतळा उभारताना तिथल्या जमिनीची प्रत शास्त्रीय दृष्टीकोनातून तपासली जाते. भूकंप झाला तर त्याचा परिणाम पुतळ्यावर होऊ नये, याचा विचार केला जातो. भूगर्भामध्ये कठीण खडक किती, पाणी किती हे तज्ज्ञांकडून प्रमाणित केल्यावरच काम सुरू होतं”, असं ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर गंज चढत असल्याबाबतचं पत्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवडाभरापूर्वीच नौदलाला पाठवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या सहा दिवस आधी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी मालवण इथल्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सहाय्यक अभियंतांनी नौदलाचे क्षेत्रिय किनारा सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवलं होतं. या पत्रात शिवपुतळ्याच्या अवस्थेविषयी तक्रार करण्यात आली होती. ‘पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्याकडून जून महिन्यात पुतळ्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचे जॉइंट करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता. त्या नट बोल्टला आता पावसामुळे आणि समुद्र किनाऱ्यावरील खारे वारे यांमुळे गंज पकडला आहे. त्यामुळे हा पुतळा विद्रुप दिसत आहे’, असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.
‘महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची दूरवस्था झाली आहे. या किल्ल्यांची दूरवस्था पाहिली की हृदयाला वेदना होतात. त्यामुळे महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करा’, असं सोलापुरचे शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे म्हणाले. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून स्मारक किंवा पुतळे उभे राहत असले तरी गड-किल्ल्यांच्या डागडुजीसाठी म्हणावा तसा निधी दिला जात नाही. अनेकदा राजकीय हेतूपोटी पुतळे उभारले जातात. पुतळे उभे राहण्यापूर्वी त्याचं राजकारण केलं जातं. मात्र असे पुतळे उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून त्याचं जतन किती प्रमाणात केलं जातं हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. मोठा तामझाम करून उंचच उंच पुतळे बांधले जातात, मात्र त्यानंतर त्यांची देखभालही व्यवस्थित केली जात नाही.