मुंबई | 8 डिसेंबर 2023 : मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर कर्जत आणि मुंबईच्या दिशेकडे बॅरिकेटींग टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी रस्ता बंद होणार असल्याने प्रवाशांना विशेषत: दिव्यांग, हृदयविकार आणि इतर व्याधी असणाऱ्या प्रवाशाची मोठी गैरसोय होणार आहे. तसेच या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरील लिफ्टचे काम पूर्ण होईपर्यंत हे मार्ग बंद करू नयेत अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेनी केली आहे. याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर शेलार आणि सदस्य संदीप शहा यांनी मध्य रेल्वेशी पत्रव्यवहार केला आहे.
मध्य रेल्वेचे सर्वात दुर्लक्षित स्थानकापैकी एक असलेल्या वांगणी रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मची सुविधा नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आयलॅंड प्लॅटफॉर्म असलेल्या वांगणी रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी ज्येष्ठ आणि दिव्यांग प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. मध्य रेल्वेने त्यात वांगणी रेल्वे स्थानकात कर्जत आणि मुंबईच्या दिशेकडे बॅरिकेटिंग करुन दोन्ही बाजू पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे दिव्यांग आणि हृदयविकार तसेच इतर व्याधी असणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मध्य रेल्वेने पूर्व आणि पश्चिमेकडे लिफ्ट मंजूर केली असली तरी लालफितीच्या कारभारामुळे पश्चिम दिशेकडील लिफ्टचे काम अद्याप अपूर्णावस्थेत आहे. शिवाय रेल्वेने प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी लिफ्ट तयार केलेली नाही. रेल्वेचे असे अनियोजन सुरु असताना आता दोन्ही दिशेकडील बेरिेकेटिंगमुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होणार आहेत. त्यामुळे वांगणी रेल्वे स्थानकात किमान एका बाजूने व्हीलचेअर जाईल एवढा रस्ता ठेवण्याची मागणी वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. या संदर्भात मध्य रेल्वेने लक्ष दिल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.