Sambhaji Bhide : शिराळा तालुक्यातील संभाजी भिडेंचा कार्यक्रम रद्द, भिडे यांची खासगी बैठक गावाबाहेर
sangli Sambhaji Bhide news : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरुड या गावी आयोजित करण्यात आलेला संभाजी भिडे यांचा कार्यक्रम पोलिस प्रशासन आणि तहसीलदार यांनी रद्द केला. त्यानंतर संभाजी भिडे यांनी गावाबाहेर एक खासगी बैठक घेतली.
भूषण पाटील, सांगली : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी मागच्या काही दिवसात अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत असा आरोप सांगलीतील विविध पुरोगामी पक्ष संघटना आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याचा एक कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील शिराळा (shirala) तालुक्यातील कोकरुड (kokarud) या गावी आयोजित करण्यात आला होता. संभाजी भिडे यांचा कार्यक्रम त्या गावातल्या एका हॉलमध्ये होणार होता. पंरतु सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दलित महासंघ,संभाजी ब्रिगेड विद्रोही चळवळ, शिवशंभो प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, छावा मराठा युवा महाराष्ट्र इत्यादी संघटनांनी त्यांच्या कार्यक्रमाला प्रखर विरोध केला. त्याचबरोबर तसं पत्र देखील पोलिस प्रशासन आणि तहसिलदार यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर प्रशासनाकडून संभाजी भिडे यांचा कार्यक्रम रद्द केला आहे.
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये विविध पुरोगामी पक्ष संघटना आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. आज दुपारी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर निषेध सभा देखील होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरोबरच दलित महासंघ,संभाजी ब्रिगेड विद्रोही चळवळ, शिवशंभो प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, छावा मराठा युवा महाराष्ट्र आधी संघटनांचे कार्यकर्ते पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बंदची हाक मागे घेण्याचं आवाहन पोलिसांनी केली आहेत.
मागच्या काही दिवसांपासून संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची अधिक चर्चा होत आहे. त्यांनी मागच्या काही दिवसात चुकीची वक्तव्ये केली असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. त्यांचा कार्यक्रम कोकरुड या गावी होणार असल्याची माहिती पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित पोलिस स्टेशन आणि तहसिलदार यांना पत्र देऊन एक पत्रकार परिषद घेतली होती. विविध संघटनांचा विरोध असल्यामुळे पोलिस प्रशासन आणि तहसिलदार यांनी सुरक्षेच्या कारणास्तव संभाजी भिडे यांचा कार्यक्रम रद्द केला.
पोलिस प्रशासन आणि तहसीलदार यांनी संभाजी भिडे यांचा कार्यक्रम घेता येणार नाही, याची माहिती आयोजकांना दिली. त्यानंतर शिराळा तालुक्यातील खिरवडे या गावाच्या बाहेर रात्री काळम्मा मंदिरात खासगी बैठक घेतली. त्या बैठकीला संभाजी भिंडे यांच्यासोबत काही कार्यकर्ते उपस्थित होते.