अचानक आले अन् मराठ्यांचे हिरो बनले, मनोज जरांगे पाटील आहे तरी कोण?
२०२१ ला त्यांनी मराठा आंदोलनात शहीद झालेल्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळून देण्यासाठी गोरीगंधारी येथे आंदोलन केले. यात ते यशस्वी झाले. २०२२ मध्ये भांबेरी येथे त्यांनी प्रदीर्घ आंदोलन केले. २०२३ मध्ये त्यांनी अंबडमध्ये मोठे आंदोलन उभे केले.
जालना | 31 ऑक्टोंबर 2023 : १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर येथे घडलेले ते प्रकरण… १५ वर्षांची निष्पाप मुलगी… तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली गेली. कोपर्डीमध्ये घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रच नव्हे तर देशही हादरला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ५७ ठिकाणी मराठा क्रांती मूक मोर्चे काढण्यात आले. त्यातील मुंबईत झालेला मोर्चा हा अभूतपूर्व असा होता. मराठा क्रांती मूक मोर्चे जसे राज्यात काढण्यात आले. त्याचप्रमाणे बिदर, इंदोर, देवास, बुऱ्हानपूर, ग्वाल्हेर या अन्य राज्यातील शहरात निघाले. अगदी परदेशातही रशिया, नेदरलँड, दुबई, अमेरिका येथे मराठा क्रांती मूक मोर्चा काढला होता.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पहिला टप्पा
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या एकूण १५ प्रमुख मागण्या होत्या. या मोर्चाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न संयमी पद्धतीने हाताळला. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चानंतर मंत्रालयात बैठक घेतली. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री, विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते, मराठा मोर्चाचे प्रतिनिधी या सर्वांची एकत्रित बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. १५ पैकी 8 मागण्या मान्य केल्या आणि इथे या मराठा आरक्षणाच्या आंदोलनचा पहिला टप्पा संपला.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा
2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्या. भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहाय्याने राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, याच काळात कोरोना संकट आले. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले. ठाकरे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यानच्या काळात ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार आले. दरम्यान जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी येथे २९ ऑगस्ट येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी उपोषण सुरु केले होते.
कोण आहेत मनोज जरांगे पाटील?
बीड जिल्ह्यातील मोतोरी हे मनोज जरांगे पाटील यांचे मूळ गावं. ते १२ वी पास आहेत. पण, आपलं गावं सोडून ते जालन्यातील अंबड येथील अंकुश नगरात स्थायिक झाले. घरची परिस्थिती सामान्य त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये काम करायला सुरवात केली. आईवडील, पत्नी, चार मुले हे त्यांचे कुटुंब आहे. मोठा मुलगा शिवराज हा बी टेक करतोय. तर दुसरी मुलगी पल्लवी ही इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे.
समाजसेवेची त्यांना आवड त्यामुळे समाजात जाऊन चर्चा करु लागले. याच काळात मराठा आंदोलनाची चळवळ सुरु झाली. मराठा आंदोलनात त्यांनी स्वतःल झोकून दिलं. जरांगे पाटील यांची चार एकर जमीन आहे. त्यातील मराठा आरक्षण आंदोलनासाठी त्यांनी दोन एकर जमीन विकली.
जरांगे पाटील यांनी कॉंग्रेस सोडली आणि शिवबा संघटनेचा विस्तार
जरांगे पाटील यांनी आपल्या सध्या पण प्रभावी भाषणाने जालना, औरंगाबाद, बीड, परभणी हे मराठवाड्यातील जिल्हे गाजवले. मराठी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांना समाजाने स्वीकारले. याच काळात काँग्रेसने त्यांना जालना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दिले. या पदालाही त्यांनी योग्य न्याय दिला.
२००३ साली महाराष्ट्रात जेम्स लेन प्रकरण चिघळले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणताही तडजोड होणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे पक्षात वाद झाले आणि त्यांनी कॉंग्रेस सोडली. सुमारे नऊ वर्षानंतर २०११ ला त्यांनी शिवबा संघटना स्थापना केली. त्याचा मराठवाड्यात विस्तार केला.
२०१४ साली आरक्षणाच्या मागणीसाठी शिवबा संघटनेने छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढला. २०१६ साली बीड जिल्ह्यातील नगद नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांनी ५०० फूट मोठ्या भगव्या ध्वजाची उभारणी केली. पण, कोपर्डी येथील प्रकरणातील आरोपींना न्यायालयाबाहेर काही जणांनी मारहाण केली ते जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेचे कार्यकर्ते होते. या एका घटनेमुळे जरांगे पाटील यांची राज्यात चर्चा होऊ लागली.
वर्षातील तिसरे मोठे आंदोलन आणि उपोषणाची सुरवात
२०२१ ला त्यांनी मराठा आंदोलनात शहीद झालेल्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळून देण्यासाठी गोरीगंधारी येथे आंदोलन केले. यात ते यशस्वी झाले. २०२२ मध्ये भांबेरी येथे त्यांनी प्रदीर्घ आंदोलन केले. २०२३ मध्ये त्यांनी अंबडमध्ये मोठे आंदोलन उभे केले.
पैठण फाटा येथे जनआक्रोश मोर्चा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या सुरवातीचे मूळ पैठण फाटा येथे आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी लाखभर लोक जमा झाले होते. पण, सरकारने त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर, जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले.
१ सप्टेंबरला पोलिसांचा लाठीमार
अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले. पण, या आंदोलकांवर पोलिसांनी १ सप्टेंबरला लाठीचार्ज केला आणि जरांगे पाटील राज्यातच नव्हे तर देशात चर्चेला आले. त्यांचे आंदोलन सुरु असताना त्यांनी आपल्या भाषणातून कोणत्याही समाजाविरोधात भूमिका घेतली नाही. कोणत्याही पक्षावर टीका केली नाही. केवळ मराठा आरक्षण हाच ध्यास त्यांनी घेतला. त्याच मुद्द्याने त्यांची भाषणे सुरु असल्याने हा सामान्य कार्यकर्ता देशाचा हिरो झाला.
समाजाने नेतृत्व मान्य केले
मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. एक महिन्याची मुदत मागितली. त्यावेळी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. पण, त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. मराठा आरक्षण कसे मिळेल हे ते समाजाला समजावून सांगत होते. आपल्या मागणीवर ते कायम ठाम राहिले. त्याचा हाच गुण मराठा समाजाला भावला आणि समाजाने त्यांचे नेतृत्व मान्य केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस. अन्न, पाणी वर्ज्य केलंय. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही हा त्यांचा पण आहे. प्रकृती ढासळली. उभं राहता येत नाही. त्यामुळे सगळीकडे चिंता पसरलीय. नेते, आमदार, मंत्री यांना गावबंदी हा मनोज जरांगे पाटील यांचा आदेश मराठा समाज पाळत आहे. आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय. मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. हा प्रश्न आता कधी आणि कसा सुटणार याची आता मराठा समाजाला उत्सुकता आहे.