…म्हणून आघाडीने लोकसभेला माझं तिकीट कापलं, खा. सुजय विखेंचा गौप्यस्फोट
हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझं लोकसभेला तिकीट कापलं, असा गौप्यस्फोट खासदार सुजय विखे यांनी केला आहे.

अहमदनगर : हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझं लोकसभेला तिकीट कापलं, असा गौप्यस्फोट खासदार सुजय विखे यांनी केला आहे. अहमदनगरच्या वाळकीमधल्या सभेत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. (Sujay Vikhe patil On Loksabha Candidancy And Sharad pawar)
सुजय विखे म्हणाले, “उमेदवारी देण्याच्या अगोदर ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी मला प्रश्न विचारला की तू आताच जर हेलिकॉप्टरमधून फिरत असशील तर तू निवडून कसा येणार?. नंतर आघाडीने मला तिकीट नाकारलं. आणि त्यानंतरचं सगळं आपल्यासमोर आहे”, असं सुजय विखे म्हणाले.
“हेलिकॉप्टरचा कुणाला फायदा कुणाला झाला असेल-नसेल, पण माझं हेलिकॉप्टरने नक्की नुकसान झालंय, असं ते म्हणाले. मात्र त्याकाळात जरी नुकसान वाटलं असेल तरी आता आज त्याचे फायदे मला दिसतात, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत असल्याचा मला मनोमन अभिमान वाटतो. मोदी ज्या झंझावाताने काम करतात त्या कामाचं मला अप्रूप असल्याचं देखील सुजय विखे म्हणाले.
विखे-शरद पवार वाद
आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल, पण नगर दक्षिणची जागा काँग्रेससाठी सोडणार नाही, असा पवित्रा लोकसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचं चित्र होतं. तत्कालिन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आताचे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंना ही जागा हवी होती.
आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत होती. पण नगरमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही जागा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सुजय विखेंनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपने सुजय यांना लोकसभेची उमेदवारी घोषित केली. राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांना हरवून ते लोकसभेत पोहचले तसंच तिकीट नाकारणाऱ्या आघाडीला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
(Sujay Vikhe patil On Loksabha Candidancy And Sharad pawar)
संबंधित बातम्या
बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातला वाद नेमका काय आहे?