माझी आई माझी गुरु होती… सरकारला एकच विनंती, सुलोचना दीदींच्या मुलाने कोणती खंत व्यक्त केली?
सुलोचना चव्हाण निधनाने स्वरांच्या आकाशगंगेतील एक तारा निखळला आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना मांडल्या.
मुंबईः माझी आई माझी गुरु होती. आज ती मला सोडून गेली. ज्या काळात लावणीकडे वक्रदृष्टीने पाहिलं जायचं. त्या काळात आईने तो दृष्टीकोन बदलला. फडावरची लावणी घराघरात पोहोचवली. पण आज तिच्या निधनाच्या वेळी मनात एकच खंत आहे. सरकारने आईला पद्मश्री पुरस्कार दिला. पण तो ज्या वयात मिळायला पाहिजे होता, त्या वयात नाही दिला, अशी भावना सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांचे पुत्र विजय चव्हाण (Vijay Chavan) यांनी व्यक्त केली. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं आज मुंबईतील फणसवाडी येथे राहत्या घरी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. शनिवारी दुपारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती विजय चव्हाण यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी एक खंत बोलून दाखवली. सरकारने आईला ज्या वेळी पद्मश्री पुरस्कार दिला. त्यावेळी तिची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती.
हा पुरस्कार कशासाठी आणि कुणाकडून मिळतोय, हेही त्यांना आठवत नव्हते. येत्या काळात कलाकारांचा योग्य वेळी सन्मान करावा, अशी भावना चव्हाण कुटुंबियांनी व्यक्त केली. या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त
आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने अनेक लावण्या ठसकेबाज करणाऱ्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी, पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. त्यांच्या निधनाने स्वरांच्या आकाशगंगेतील एक तारा निखळला आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना मांडल्या.
शरद पवारांची प्रतिक्रिया काय?
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शऱद पवार यांनी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय- ज्येष्ठ पार्श्वगायिका लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. बुलंद आवाज व ठसकेबाज शैलीने त्यांनी लावणीला एका वेगळ्या उंचीवर नेले. ६० वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय?
सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने लावणी गायकीतला तडफदार आवाज हरपला. बहारदार लावण्यांची मैफील संपली. महाराष्ट्राच्या चित्रपट व सांस्कृतिक जगताची हानी झाली, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.