शिंदे गटाच्या बंडाचे निशाण फडकविणारा पहिला आमदाराच दुरावला ? राजकीय भूकंप होण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडातील मी पहिला आमदार असतांना नाशिक जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करतांना मला विश्वासात घेतले जात नाही.
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे निशाण फडकविणारे शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार सुहास कांदे नाराज आहेत का ? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आलेले असतांना आमदार कांदे यांनी उपस्थिती लावली नव्हती. इतकंच काय शिंदे गटाच्या प्रत्येक कार्यक्रमात आमदार सुहास कांदे यांची अनुपस्थिती राहिल्याने सुहास कांदे नाराज आहेत का ? याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र यावर स्वतः सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी मी नाराज नाही हे ठासून सांगत असतांना कांदे यांनी नाराजीचा पाढाच वाचला आहे. सुहास कांदे हे नांदगाव मतदार संघाचे आमदार असून ते सध्या शिंदे गटाचे आमदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तिय असलेले आ.सुहास कांदे यांनी राज्याचे बंदरे व खणीकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या एकतर्फी कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपली ‘ नाराजी ‘ व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडातील मी पहिला आमदार असतांना नाशिक जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करतांना मला विश्वासात घेतले जात नाही.
पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याबद्दल आदर मात्र त्यांनी घेतलेल्या कुठल्याही बैठकांना आमदार म्हणून मला बोलावले जात नाही,साधे निमंत्रण सुद्धा दिले जात नसल्याची मनातील खदखद नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री यांच्या शिंदे गटात ‘ सारं काही अलबेल ‘ नसल्याचे स्पष्ट झाले असून शिंदे गटातील नाराजीचा सुरू या निमित्ताने बाहेर आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझे कायम प्रेम राहिले असून माझ्यावर कितीही अन्याय झालं तरी मरेपर्यंत शिंदे यांच्यावरच प्रेम करणार असल्याचे देखील आ.कांदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी नाराज नाही मात्र नाराजीचा पाढाच श्री.कांदे यांनी या पत्रकार परिषदेत वाचला. गेल्या काही दिवसांपासून आ.कांदे हे नाराज असल्याचे दिसत आहे.
आज अखेर त्यांनी पक्ष व पक्षात घेतल्या जाणाऱ्या निर्णयाविरोधात नाराज असल्याचे पत्रकार परिषद घेवून स्पष्ट केले.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील नाशिक येथील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करतांना देखील विश्वासात घेतले जात नसून वर्तमान पत्रातील नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर मला कळते असा आरोप आ.कांदे यांनी यावेळी केला.