हरीत लवादाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, ढोल-ताशा, साउंडच्या आवाजावरील अटींबाबत मोठा निर्णय
हरीत लवादाने ढोल-ताशा साऊंडच्या आवाजावर अटी लावल्या होत्या. त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने याबाबत महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे.
राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणेशोत्सव म्हटलं म्हणजे ढोल-ताशांचा गजर आला, लाउडस्पीकरचा आवाज आला. पण ध्वनी प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर या उत्सव काळात आवाजाची तीव्रता वाढू नये यासाठी राष्ट्रीय हरीत लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत हरीत लवादाने गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही अटी-शर्ती ठेवल्या होत्या. यानुसार आवाजाची तीव्रता वाढू नये यासाठी काही नियम घालण्यात आले होते. पण या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद घालत हरीत लवादाच्या आदेशाला तात्पुरती स्थहिती दिली. गणपती विसर्जनाच्या दिवशी 17 तारखेला एका दिवशी परवानी देण्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने केला. त्यामुळे गणपती मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ढोल-ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावे, असा आदेश हरित लवादाने दिला होता. या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हरित लवादाने गेल्या 30 ऑगस्ट रोजी वादकाच्या संख्ये संदर्भात आदेश दिला होता. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीशांनी हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली.
सुप्रीम कोर्टाचा नेमका निर्वाळा काय?
हरीत लवादाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. हरीत लवादाने ढोल-ताशा साऊंडच्या आवाजावर अटी लावल्या होत्या. त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने एका दिवसासाठी मुभा दिली पाहिजे, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
वकील सिद्धार्थ शिंदे नेमकं काय म्हणाले?
“हरीत लवादाचा निर्णय आहे, त्यावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. म्हणजे 17 सप्टेंबरला पुण्यात गणेश विसर्जनाच्या वेळी काहीच रिस्ट्रिक्शन नसेल. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, वर्षातून एक दिवस असतो आणि त्यामध्येही तुम्ही ध्वनी प्रदुषणाच्या नावावर अटी लावल्या तर चुकीचा संदेश जातोय. याचाच अर्थ येत्या 17 सप्टेंबरला गणपती विसर्जन जोरातच होईल, असं म्हणावं लागेल”, अशी प्रतिक्रिया वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.