संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणारा ‘आकाचा आका’ही तोच… सुप्रिया सुळेंचे खळबळजनक विधान
बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्या मते, खंडणी मागणारा आणि हत्या करणारा एकच व्यक्ती आहे जो हत्याकाळी फोनवरून विकृतपणे मजा घेत होता.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. तरी अद्याप एक आरोपी फरार आहे. याप्रकरणी विविध धक्कादायक खुलासे आतापर्यंत समोर आले आहेत. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. बीड जिल्ह्यात आवादा कंपनीकडून खंडणी मागणारा आणि संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणणारा ‘आकाचा आका’ तो एकच व्यक्ती आहे. ही व्यक्ती संतोष देशमुख यांची हत्या होत असताना फोनवरुन विकृतपणे या सगळ्याची मजा घेत होती, असे खळबळजनक विधान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यामुळे खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची रविवारी पुण्यात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे हजर होत्या. त्यासोबतच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बापू पठारे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटासह धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे यांची या बैठकीतील ऑफ द रेकॉर्ड भाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘आकाचा आका’ही तोच
“मला मिळालेल्या माहितीनुसार, आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यानुसार मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना तिकडे एका व्यक्तीने फोन केला होता. ही व्यक्ती त्यांची गंमत बघत होते. किती ही विकृती? हे वास्तव आहे. ही व्यक्ती खंडणी, सत्ता आणि पैशांच्या जीवावर हे सगळे करत होती. एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र पाठवली होती. आवादा कंपनी वाईट आहे, त्यांच्याकडे चांगले काम होत नाही, त्यांना बीडमधून काढून टाका, अशी मागणी या व्यक्तीने पत्राद्वारे केली होती. खंडणी मागणारा तोच, आवादाला हद्दपार करण्यासाठी पत्र लिहिणारा तोच आणि संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणारा ‘आकाचा आका’ही तोच. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर आल्या आहेत”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“…त्यांची विकेट आपण काढायची”
संतोष देशमुख यांच्याप्रमाणे महादेव मुंडेची परिस्थिती झाली. कोणीतरी या सगळ्याविरोधात लढले पाहिजे. लोकांच्या विरोधी पक्षाकडून खूप अपेक्षा आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या काही दिवसात सत्ताधाऱ्यांची कामगिरी चांगली आहे की मविआची कामगिरी चांगली आहे, हे बघा. शंभर दिवसांच्या आत एक विकेट गेले, आता पुढे बघा काय-काय होतं? जे डबल डेंजर आहेत, त्यांची विकेट आपण काढायची, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“ही लढाई खूप मोठी”
“महिला आणि शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांची विकेट आपण काढायची. एक नेता सगळीकडे आपल्या बायकोला पुढे करतो आणि स्वत: पुढे येत नाही. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिंमत असेल, तर समोर येऊन लढ. ही लढाई खूप मोठी आहे”, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.