मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळेंचा सुरेश धसांना टोला, मी कोणालाही…
Massajog Sarpanch Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी आरोपींना शिक्षा होत नाही, आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे. यामुळे देशमुख कुटुंबियांसह गावकरीही प्रचंड आक्रमक झाले आहेत.

मी काही इथे भाषण करायला आलेले नाही , फक्त या कुटुंबाची भेट घ्यायला आले. ही ( वैभवी) कोणाची तरी लेक आहे, मी सुद्धा कोणाची तरी लेक आहे. ती माऊली 40 वर्षांची पण नाही , आज तिच्या कपाळावर कुंकू नाहीये. संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झालेत. आपलं मूल जाणं यापेक्षा मोठं दु:ख कोणत्याही आईसाठी नाहीये. माझ्या मावशीचा असाच एक मुलगा खुप लहान वयात गेला. आज त्या घटनेला 20-25 वर्षं झाली असतील तरी माझी मावशी ते विसरू शकलेली नाही, सावरली नाही अजून. एका आईचं दु:ख, एका बहिणीचं दु:ख, एक लेक , एक मुलगा… आपण खरंच या कुटुंबाला कधी न्याय देऊ शकू का ? कारण त्यांचे वडील परत आल्याशिवाय त्यांना न्याय कसा मिळेल ? माझी खरंच इच्छा होती हा राजकारणाचा विषय नाही. आपण महाराष्ट्राचा, भारताचा एक मुलगा यात गमावला आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिला अधिकार दिले, त्याच देशात एका कुटुंबाला 70 दिवस झाले न्याय मिळत नाही.
या सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या घटना होत्या, पण मी ठरवंल काहीही होऊ दे, कोणीही जबाबदारी घेवो किंवा न घेवो, माणुसकीच्या नात्याने हा लढा लढणार आहे, असा शब्द मी तुम्हाला देते असे सांगत सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी आरोपींना शिक्षा होत नाही, आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे. यामुळे देशमुख कुटुंबियांसह गावकरीही प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्याच देशमुख कुटुंबियांची, गावकऱ्यांची आज सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली, त्यावेळी बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांची मुलगी, पत्नी, आई यांचे सांत्वन करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि देशमुखांना न्याय मिळवून देण्याचे वचन दिले.
मुख्यमंत्र्यासमोर पदर पसरून न्याय मागणार आहे
माझं मतं आणि मुख्यमंत्र्यांचं मतं, टोकाची राजकीय मतं आहेत, पण मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. या प्रकरणात आठ दिवसात न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. हे राज्य राजे छत्रपतींच्या संस्काराने चालेल शाहू फुलेंच्या संस्काराने चालतं. मी आता महाराष्ट्रातील महिला म्हणून खासदार म्हणून नव्हे मुख्यमंत्र्यांचा वेळ मागणार आहे, पदर पुढे करणार आहे,न्याय मागणार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका तुमचा लढा आम्ही लढू असे त्यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांना सांगितलं. आठ दिवसापूर्वी खा. सोनवणे आणि मी अमित शहांना भेटून आलो, या प्रकरणात लक्ष घालू असा शब्द त्यांनी आम्हाला दिला असंही सुळे यांनी नमूद केलं.
मी कोणालाही भेटणार नाही, कॉम्प्रोमाईज करणार नाही
माझ्याकडे याचे फोटो आहेत पण आम्हाला राजकारण करायचं नाही. न्याय मिळाला नाही तर ती सत्ता काय करायची ? मी तुम्हाला शब्द देते, मी कोणालाही कुठे भेटणार नाही, काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाईजचा तर विषय नाही , असे म्हणत सुळे यांनी सुरेश धसांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. ही सगळी जी मस्ती आहे यांची, सत्तेची आणि पैशांची मस्ती, ती उतरलीच पाहिजे असं सुळे म्हणाल्या.
घ्या लाटणं अन् ठोकून काढा, मस्साजोगमध्ये महिलांना आवाहन
बीड अतिशय सुसंस्कृतीला जिल्हा आहे, बीडचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना आहे. या बीडला बदनाम करण्याचं काम पाच-दहा लोकांनी केला आहे. आता महिलांनी लढाई हातात घेतली पाहिजे, समोर कोणी आलं तर घ्या हातात लाटणं आणि ठोकून काढा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. वेळ पडली तर आम्ही अन्नत्याग करू पण तुम्ही करू नका. जे झालं त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते माझ्याकडे शब्द नाहीत. जोपर्यंत तुमच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.