आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या बारामतीमध्ये बोलत होत्या. नेहमीच आपली सभा मिशन स्कूलच्या पंटागणात होते, लोकसभेपासून एक नवीन प्रथा सुरू झाली पवार साहेबांनी भाषण केलं की ती जागा आपली. आपली प्रचाराची जागा अजित पवारांनी काढून घेतली, त्यामुळे लोकसभेच्या प्रचाराची शेवटची सभा आपल्याला इथेच घ्यावी लागली, आणि आपण जिंकलो. सगळे तिकडे चालले असताना धैर्यशील दादा आमच्याकडे आले, धैर्यशील दादांची तुतारी नक्की वाजणार आहे, विधानसभेला सोलापुरात तुतारी जोरात वाजणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या पांडुरंगानं आपल्याला तुतारी दिली आहे. घड्याळाचा निकाल अजून कोर्टात आहे. अजित पवारांनी पक्ष, चिन्ह काढून घेतलं. हे निधीसाठी सोडून गेले नाहीत तर ईडीच्या भीतीनं तिकडे गेले असा घणाघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्यावर केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, काल टेक्सटाइल पार्कमध्ये तो प्रकार घडला, हे म्हणतात आम्हीचं सर्व केलं. बारामतीत साहेबांनी सगळं केलेलं हे सर्व विसरले. टेक्सटाइल पार्कमधील 50 टक्के युनिट बंद आहेत, साहेबांनी तर काहीच केलेलं नाही ना? असं म्हणत त्यांनी बारामतीच्या प्रचारसभेत जोरदार फटकेबाजी केली.
दरम्यान आता मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन मोठ्या पक्षात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर राज्यात प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे यावेळी मतदार कोणाला कौल देणार? राज्यात कोणाचं सरकार येणार याकडे राज्याचचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. येत्या तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे, सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.