अखेर सुरेश धस यांची तलवार म्यान, त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी; म्हणाले ‘मी अजितदादांसाठी डोक्यात दगडं…’
सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावरून वातावरण चांगलंच तापलं. अखेर या प्रकरणावर बोलताना आता सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले. आता या प्रकरणात सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
‘अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतले, अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…, आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतले?’ असा सवाल धस यांनी केला होता. आता या प्रकरणात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी माझे शब्द मागे घेतो असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले धस?
मला वाटतं त्यांना त्याचा राग येणार नाही, कारण अजितदादांसाठी मी देखील डोक्यात दगडं खाललेले आहेत. त्या अधिकार वाणीने तेवढा शब्द माझ्याकडून गेला असला तरी तो माझा मी परत घेतो, असं धस यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे, यावर देखील धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांनी आदरनीय बाळासाहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे. आदरनीय पवारसाहेबांसोतब त्यांनी काम केलं आहे. ते मुरब्बी राजकारणी आहेत. तुम्ही आता भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट ओळखून घ्या. त्यांनी नाही म्हटलं म्हणजे काय ते ओळखून घ्या, असं धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की वंजारी समाजातील 99 टक्के लोकांना हे प्रकरण पटलेलं नाहीये. त्याच्या समाजातील मुकादमांना देखील या टोळीचा त्रास होता. त्यामुळे या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, अशी मागणी देखील धस यांनी केली आहे.