सुरेश धस यांच्याकडून देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा काय? धनंजय देशमुख पहिल्यांदाच थेट काय बोलले?
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनंजय देशमुख यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की सुरेश धस यांची अपेक्षा आहे की या प्रकरणात कोणीही सुटणार नाही.

भाजप नेते सुरेश धस हे गेल्या काही काळापासून सातत्याने धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत आहे. एकीकडे आरोप करत असताना दुसरीकडे मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आजारी होते, त्यामुळे माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता या भेटीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सुरेश धस यांच्याकडून देशमुख कुटुंबियांच्या अपेक्षा काय याबद्दलही सांगितले.
धनंजय देशमुख यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुरेश धस यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिले. या प्रकरणातून कोणीही सुटलं नाही पाहिजे हीच सुरेश धस यांची अपेक्षा आहे. ते त्या अपेक्षांना पूर्ण करतील, असे धनंजय देशमुख म्हणाले.
“तुम्ही जबाबदारी घेतली ती शेवटपर्यंत निभवावी”
“अण्णाकडून सगळ्या गावाला कुटुंबियांना पहिल्या दिवसापासून अपेक्षा आहे. सुरेश अण्णा यांनी मुख्यमंत्री आणि देशमुख कुटुंबियातील दुवा म्हणून काम केलं. SIT नेमायची असेल, सीआयडीमधील अधिकारी नेमायचे असतील. तर या प्रकरणातील ज्या गोष्टी आहेत, त्या आम्ही अण्णांकडे सांगायचो, त्यावर अण्णा आम्हाला सांगायचे. यातून कोणी सुटलं नाही पाहिजे हीच अपेक्षा अण्णांची आहे आणि ते अपेक्षांना पूर्ण करतील. मनोज दादाची सुद्धा तीच अपेक्षा आहे. तुम्ही जबाबदारी घेतली ती शेवटपर्यंत निभवावी अशी आमची देखील भावना आहे”, असे धनंजय देशमुख म्हणाले.
“आमच्या शिष्टमंडळातील काही लोक आहेत ते अण्णाला बोलले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमच्याकडून एकही चुकीचं काम होणार नाही. माझ्याकडून एकही गोष्ट अशी होणार नाही की हे आरोपी सुटतील, जे जे करता येईल ते तुम्ही मला सांगा मी करणार”, असे सुरेश धस यांनी सांगितले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक आरोपी फरार
दरम्यान बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर मकोका लावण्यात आला असून त्याअंतर्गत कारवाई सुरु आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आले. त्याचा काहीही शोध लागलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तसेच विरोधकांकडून आरोपही केले जात आहेत.