‘वाल्मिक कराड काय…’; अन् सुरेश धस प्रचंड संतापले
दोन दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हा कारागृहात मोठा राडा झाल्याचा दावा करण्यात येत होता, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

दोन दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हा कारागृहात मोठा राडा झाल्याचा दावा करण्यात येत होता, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र बीड कारागृह प्रशासनानं हा दावा फेटाळून लावला होता. मीडियामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याच्या बातम्या प्रसारीत करण्यात आल्या, मात्र त्यांना कोणतीही मारहाण झाली नसल्याचं कारागृह प्रशासनानं म्हटलं होतं.
मात्र त्यानंतर कारागृहात प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. जेलमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांना दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण केली असा त्यांच्यावर आरोप आहे, तर दुसरीकडे महादेव गित्ते याने हा आरोप फेटाळून लावला आहे, आम्हालाच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचं महादेव गित्ते याने म्हटलं आहे. मारहाण झाल्यानंतर आम्हाला रुग्णालयात देखील नेलं नाही, उलट आम्हालाच दुसरीकडे हलवत आहेत, असंही त्याने म्हटलं होतं.
जेल प्रशासनाच्या या निर्णयानंतर आता भाजप आमदार सरेश धस देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. बीडच्या जेलमधून महादेव गीत्तेला हलवलं. अक्षय आठवलेला हलवलं. मारहाणीच्या घटनेनंतर जेल प्रशासनाने ही कारवाई केली, मग वाल्मिक कराड हा काय जेल प्रशासनाचा जावई आहे का? असा सवाल आमदार सुरेश धस यांनी केला आहे. मी अजित पवार यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासोबतच हा देखील मुद्दा मी यावेळी अजित पवार यांच्यासमोर मांडला असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत होता. अक्षय आठवले आणि महादेव गित्ते यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मात्र तुरुंग प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला आहे. परंतु त्यानंतर अक्षय आठवले आणि महादेव गित्ते यांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे.