एक्क्याकडे छक्का दूरीकडे सत्ता, ओपन जेऊ देईना, क्लोज झोपू देईना, पत्त्यांचं गणित सांगत सुषमा अंधारे यांची कुणावर टीका?
दारूचे ठेके, वाळूचे ठेके, मटक्याचे धंदे, अवैध धंदे. असं पण करावं लागतं? मला काही त्यातलं जास्त कळत नाही. खासदार हेमंत पाटील यांच्या अंगात ही मस्ती येतेच कुठून? हेमंत पाटील हा आदिवासी एकटा नाही त्यांच्यासोबत त्यांची बहीण आहे.
हिंगोली | 19 नोव्हेंबर 2023 : हिंगोलीमध्ये बिरसा मुंडा यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी इकडच्या काही लोकप्रतिनिधीला जे गणित जमते तेच खरं गणित आहे. एक्क्याकडे छक्का दूरीकडे सत्ता, तीरीकडे आठ्ठ्या, चौकाकडे नौवा, पंजाकडे दशा. ओपन जेऊ देईना आणि क्लोज झोपू देईना, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी स्थानिक आमदार, खासदार यांच्यावर सडकुन टीका केली.
आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली यांच्या वतीने कळमनुरी शहरातून क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य करत रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले.
सुषमा अंधारे यांनी हिंगोलीमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्याच्या मुद्द्यांवरून आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार संतोष टार्फे उपस्थित होते. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता सुषमा अंधारे म्हणाल्या, माजी आमदार संतोष टार्फे तुम्ही मिशी काढण्याचे काही बोलत नाही. पण, असं बोलणारे लोक वेगळे असतात. इकडे भरपूर काही लागते. दारूचे ठेके, वाळूचे ठेके, मटक्याचे धंदे, अवैध धंदे. असं पण करावं लागतं? मला काही त्यातलं जास्त कळत नाही असा टोला त्यांनी आमदार बांगर यांना लगावला.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना शौचालय साफ करायला लावले होते. या प्रकरणात हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. हाच संदर्भ देत सुषमा अंधारे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावरही टीका केली.
खासदार हेमंत पाटील यांच्या अंगात ही मस्ती येतेच कुठून? हेमंत पाटील हा आदिवासी एकटा नाही त्यांच्यासोबत त्यांची बहीण आहे असे म्हणत शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना इशारा दिला. आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांच्यावर बोलण्यासाठी मी वेगळी सभा घेणार आहे असेही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.