फडणवीसांचं मौन सगळं सांगतं, अजितदादांचा स्क्रिप्ट रायटर कोण? सुषमा अंधारे यांनी ‘या’ नेत्याचं घेतलं नाव
खारघर येथे उष्माघाताने झालेल्या मृत्यूवरून सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ' हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असाल तर या पापाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा..
भूषण पाटील, कोल्हापूर : काल दिवसभरातल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळाचे प्राण अक्षरशः कंठाशी आणले होते. एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) बंड कळलं, ते आमदार थेट सूरतेत गेल्यावर. पण अजित पवार (Ajit Pawar) बंडाच्या पावित्र्यात आहेत, या बातम्यांनी गेला आठवडाभर गोंधळ माजला. अनेकांनी दावे केले. प्रत्येक कृतीवर सगळ्यांची नजर होती. अखेर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचं स्पष्टीकरण दिलं अन् ते एक पाऊल मागे आल्याचं दिसून आलं. कालचं नाट्य अत्यंत उत्कंठेने पाहत असलेले आता एक एक करून प्रतिक्रिया देत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून भाजपवर तीव्र निशाणा साधला आहे. अजितदादांची ही स्क्रिप्ट भाजपने लिहिली होती, असे अंधारे म्हणाल्या. तर त्याचे लेखक कोण होते, हेही सांगितलं. कोल्हापुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सुषमा अंधारे यांनी ही टीका केली.
नाट्याचे स्क्रिप्टरायटर कोण?
अजित पवार यांच्या कालच्या नाट्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यानिमित्ताने शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत. त्यांचे स्टेटमेंट पाहता, शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. तर महाविकास आघाडी अभेद्य आहे.
आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत. अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे. वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसदानंतर भाजप कडून हे केले जात आहे. फडणवीस यांचे मौन सगळे सांगून जाते. या खेळाचे स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत. हे नाट्य घडवलं तरीही पुलवामा आणि इतर विषयावर प्रश्न विचारणं आम्ही थांबवणार नाहीत. मुद्दे डायव्हर्ट करणारे बालिश खेळ भाजपने बंद करावेत, असा इशारा अंधारे यांनी दिलाय.
पापाची जबाबदारी घ्या…
तर खारघर येथे उष्माघाताने झालेल्या मृत्यूवरून सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘ हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असाल तर या पापाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.. खारघर येथे उष्माघात नव्हे तर सुविधेअभावानेही लोक मृत झाले आहेत.
अप्पासाहेबांनी साधेपणाने कार्यक्रम करावा आशा सूचना केल्या असतील. मात्र त्यांनी दिलेली वेळ घेतली म्हणत त्यांच्याबद्दल भाजप चुकीची माहिती देत आहे. मृतांचा आकडा लपवला गेला आहे. 100 हुन अधिक मृत झाले असावेत, असा अंदाज सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमावर 16 कोटी खर्च करता तर अजून थोडे पैसे खर्च करून पेंडाल का उभे केले नाही, आरोग्य विभागाला अगदी शेवटच्या वेळी कार्यक्रमाची कल्पना का दिली नाही, स्वतंत्र रुग्णवाहिकेचा मार्ग का केला नाही, असे सवाल सुषमा अंधारे यांनी केले.
मतांचं राजकारण..
अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत कार्यक्रम घेतला गेला. शिंदे फडणवीस यांनी खेळ केला. भाजपचा कोणताही नेता या लोकांपर्यंत पोहचला नाही. अमित शहा यांनीही मतांचं राजकारण केलं. अमित शहा मृत लोकांपर्यंत पोहचले नाहीत. एवढे सुद्धा तत्त्व त्यांनी पाळले नाहीत, अशी टीका अंधारे यांनी केला. तर मुख्यमंत्री या घटनेला जबाबदार आहेत, ही जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.