योगेश बोरसे, पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न केले. मात्र कुठेही त्यांच्याविरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. अंधारे यांनी आज पुणे कोर्टात शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. संजय शिरसाट यांच्याविरोधात त्यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांना आता यासंबंधीचं स्पष्टीकरण कोर्टासमोर द्यावं लागणार आहे.
पुणे कोर्टात संजय शिरसाट यांच्याविरोधात दावा दाखल करताना सुषमा अंधारे यांनी राज्यातील पोलीस विभाग तसेच गृहविभागावर गंभीर आरोप केले. परळी, पुणे तसेच संभाजीनगर येथेही शिरसाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दाखल करून घेतला गेला नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या राज्याचे चालक, पालक असतात. या पदाचा चार्ज घेताना त्यांनी शपथ घेतली होती, आमच्या निदर्शनास आणून दिलेली बाब याबद्दल अधिकचा ममत्व , आकसता न बाळगता, आम्ही पारदर्शकतेने ही बाब विचाराधीन ठेवू.. पण प्रत्यक्षात ते दिसत नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय.
शीतल म्हात्रे प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल होतात, लोकांना अटक होते. गणेश बिडकर भाजपचे आहेत. त्यांच्या नुसत्या सांगण्यावरून त्यांचा डान्सबारमधला व्हिडिओ व्हायरल झाला.. मग ते वैयक्तिक प्रकरण होतं असं सांगितलं. पण नाना पटोले यांचंही प्रकरण वैयक्तिकच होतं. नाना पटोलेंचा फोटो रिलीज करता आणि गणेश बिडकरांना वेगळा न्याय देता, हा दुटप्पीपणा मला जगासमोर आणायचा आहे.
कोर्टात जाण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी टीव्ही 9 शी बातचित केली. त्या म्हणाल्या, ‘ आता मी 156-3 नुसार कोर्टातून दावा दाखल करणार आहे. क्रिमिनल आणि सिव्हिल या दोन्ही प्रकारे खटले दाखल करत आहे. या केसमध्ये मी 3 रुपयांची अब्रुनुकसानीची मागणी केली आहे, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.
दरम्यान, आमदार संजय शिरसाट यांनीदेखील आज पत्रकार परिषद घेतली. मी काहीही चुकीचं बोललो नाही, हेच त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं. ते म्हणाले, ‘ मी एखादा शब्द वापरला की मिरची लागते. मी कुणाच्या वैयक्तिक गोष्टीत जात नाही, मात्र परळीत कुणाची धिंड काढली होती? मला जास्त बोलायला लावू नका. मी मग समुद्राच्या खोलात जाईल, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय.