कुणाल कामरावरून राजकारण तापलं, ‘मातोश्री’वर भुंकायची सुपारी राणेंना कोणी दिली? अंधारेंचा थेट सवाल
कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. साठ ते सत्तर शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली. कुणाल कामराने माफी मागावी अन्यथा त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे. कुणाल कामराच्या वक्तव्यावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंधारे?
संविधानानुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोकाट अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कुणाल कामरा हे याच देशाचे नागरिक आहेत. त्यांना हे स्वातंत्र्य असायला हरकत नाही, कुणाल कामराच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही आशलाघ्य भाषा नाही. कुठलाही कलाकार त्याचं म्हणणं उपासात्मक पद्धतीनं मांडू शकतो. लोकांनी सोलापूरकरांचा स्टुडिओ फोडला नाही, सुपारी देण्याची गोष्ट करणाऱ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचा विसर पडला की सुपारी देण्याची प्रथा तुम्ही पाडली आहे. आम्ही त्याचे कधी भागीदार नाहीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त मातोश्री वरतीच भुंकणे ही सुपारी राणेंना कोणी दिली? असा हल्लाबोल यावेळी सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रशांत कोरटकरांच्या अटकेवरून देखील टीका केली आहे. प्रशांत कोरडकरला अटक केली यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचं काय कार्य कर्तुत्व आहे? प्रशांत कोरटकरला अटक करायची असती तर ज्या दिवशी हे झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अटक करू शकले असते. असं न करता महाराष्ट्र पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवली. आत्ताची अटकेची कारवाई झाली आहे, ती तेलंगणा पोलिसांनी केलेली आहे. गुन्हे महाराष्ट्रात घडतात आणि आरोपी मात्र यूपी बिहार तेलंगणा इकडे सापडतात. महाराष्ट्रात आरोपी सापडत नाहीत, फार फार तर महाराष्ट्रात आरोपी स्वतःहून हजर होतात, असंही यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.