नागपूरः सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court)आज अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. महाराष्ट्रातल्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय कोर्टानं दिलाय. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे विधीमंडळ अधिवेशनात आता हे आमदार उपस्थित राहू शकतील. भाजपचं संख्याबळ वाढेल. हे निलंबन रद्द झाल्यानंतर भाजप आमदारांनीही (BJP MLA) पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरण्याची भाषा केली आहे. तीन चाकांच्या सरकारनं कायद्यात राहून राज्य करावं, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच यापुढे मतदारांचे प्रश्न सभागृहात मांडू शकणार असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रियाही भाजप आमदारांनी व्यक्त केली आहे.
चिमूरचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठी चपराक दिली आहे. आता आमचं निलंबन रद्द झालं आहे. मतदारांचे प्रश्न सभागृहात मांडून आम्ही सोडवू शकतो, याचा आनंद आहे. तसेच हे सरकार या राज्याच्या विरोधात एखादा निर्णय घेत असेल. कोट्यवधी लोकांचं नुकसान होत असेल तर आदरणीय फडणवीसांच्या नेतृत्वात सभागृहात सरकारला आम्ही धारेवर धरू. दोन वर्षांपासून राज्य सरकार कायद्यानुसार चालत नाहीय. आता सर्वोच्च न्यायालयानंच सरकारला चपराक दिली आहे. आता या तीन चाकी सरकारला विनंती आहे की त्यांनी कायद्यात राहून राज्य चालवावे. नाही तर तुम्हाला चुकीच्या कामांसाठी आम्ही धारेवर धरणार’
अंथरुण पाहून पाय पसरावे, ही म्हण महाविकास आघाडीला लागू होते. लोकशाही जिवंत आहे, न्यायव्यवस्था जिवंत आहे, हे आज सिद्ध झालं. 12 आमदारांचं निलंबन रद्द झालं, त्यांना मी शुभेच्छा देतो आणि महाविकास आघाडीला या माध्यमातून जोरदार थप्पड मिळाली आहे, हे सिद्ध झालंय, अशी प्रतिक्रिया आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.
इतर बातम्या-