अखेर सस्पेन्स संपला… मी एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो की… शिंदे अखेर बॅकफूटवर; कुणाच्या मनधरणीला आलं यश?
मोठी बातमी समोर आली आहे, अखेर सस्पेन्स संपला असून एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. नव्या सरकारमध्ये देखील एक मुख्यमंत्रि आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बुधवारीच स्पष्ट झालं होतं. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार की नाही ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. आता शपथविधी सोहळ्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे अखेर एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीला यश आलं आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात आली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता आजच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
शपथविधी सोहळयाची जय्यत तयारी
या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात हा भव्य असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी 22 राज्याचे मुख्यमंत्री देखील हजर राहणार आहेत. चाळीस हजार लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्याला लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी इच्छूक होते. गृहमंत्रिपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार अशी त्यांची भूमिका होती. मात्र दुसरीकडे भाजपला देखील गृहमंत्रिपद हवं होतं. अखेर आता यावर तोडगा निघाला असून आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.