स्वाभिमानीचं टोकाचं पाऊल, कोल्हापूर क्षेत्र अधिकाऱ्याला नदीकिनारी बांधून घातलं
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण मंडळाचे अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावर बांधून ठेवलं. (Swabhimani Shetkari Sanghtana)
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghtana) कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरच्या क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावर बांधून ठेवले. सचिन हरबड हे बंधाऱ्याजवळ मृत माशांचा पंचनामा करून इथल्या परिस्थितीचा अहवाल देण्यास आले होते. यावेळी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांनी प्रदूषण मंडळातील प्रादेशिक अधिकारी आंधळे, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांची निलंबन करा, अशी मागणी केली. (Swabhimani Shetkari Sanghtana workers confine pollution officer on Terwad Dam)
तेरवाड बंधाऱ्यात प्रदूषणामुळे मृत माशांचा खच
कोल्हापूर जिल्ह्याची वरदायीनी नदी असणारी पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यात दरवर्षीप्रमाणे मृत माशांचा खच पहायला मिळाला. नदीचे प्रदूषण झालंय, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आता माशांसह नदी काठावरील माणसाचे आरोग्य धोक्यात आलंय आहे, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांनी दिला होता.
पंचगगा पुन्हा गटारगंगा झाल्याचे चित्र मंगळवारी तेरवाड बंधारा येथे पहायला मिळाले. या बंधाऱ्याजवळ दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झालेले आढळले. काही दूषित रसायनयुक्त पाण्यामुळे तडफडत असल्याचे निदर्शनास आले होते. पंचगंगा प्रदूषण मुक्तीवर सातत्याने आवाज उठविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुका युवा अध्यक्ष बंडू पाटील, सामजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी बंधाऱ्यावर धाव घेत पाहणी केली होती. त्यांनी बंधाऱ्यावरील भयानक परिस्थिती पाहून प्रदूषण मंडळ तसेच संबंधित प्रशासनावर संताप व्यक्त केला होता.
दोन दिवसात कारवाईची मागणी
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसात याकडे सबधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देऊन प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई केली नाही तर स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करणार असा इशारा दिलेला. कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोली एमआयडीसी, लक्ष्मी एमआयडीसीतील पाणी पंचगंगा नदीमध्ये जात असल्यामुळे जलचर प्राणी मासे मृत पडू लागले आहेत, असा आरोप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला. इचलकरंजी शहराचे कापसावर प्रक्रिया करणारे पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये जात असल्याचे दिसत आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असं बंडू पाटील म्हणाले होते.
पंचगंगा नदीपात्रात प्रत्येक वर्षी लाखो मासे मरतात, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होते. यंदा ही अशीच परिस्थिती असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. एकीकडे प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतील असे चित्र आहे. तर तेरवाड बंधाऱ्यावर दूषित पाण्यामुळे मासे वर येऊन तडफडत आहेत.
संबंधित बातम्या:
कापूस, सोयाबीनसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, 5 नोव्हेंबरनंतर ‘कपडे फाडो’ आंदोलनाचा इशारा
(Swabhimani Shetkari Sanghtana workers confine pollution officer on Terwad Dam)