पुणे : हर हर महादेव या चित्रपटाच्या विरोधात छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्रानंतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन झी मराठीला अखेरचा इशारा दिला आहे. हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून १८ डिसेंबर रोजी टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटास छत्रपती संभाजीराजे आणि स्वराज्य संघटनेसह राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध सुरू आहे आणि प्रदर्शित झाला तेव्हाही विरोध करण्यात आला होता. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र छत्रपती संभाजीराजे यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिलेले होते. मात्र अजूनही झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची जाहिरात दाखविली जात आहे. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी झी मराठीच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन इशारा दिला आहे.
स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी श्री विनोद साबळे व श्री अंकुश कदम यांनी झी स्टुडीओ मध्ये प्रत्यक्ष जाऊन व्यवस्थापनास इशारा दिलेला आहे.
हर हर महादेव ह चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची लेखी हमी स्वराज्य संघटनेने मागितली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांचे पत्र व समस्त शिवभक्तांच्या भावनेकडे दुर्लक्ष करून चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नका अशी विनंती वजा इशारा दिला आहे.
चित्रपट प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास झी स्टुडीओ व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान हर हर महादेव चित्रपटाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून येत्या काळात चित्रपट प्रदर्शित होतो की नाही हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.