आमच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचं नाव चुकून राहिलं : फडणवीस
राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव चुकून राहिलं असेल, तर या सरकारने ताबडतोब ही चूक दुरुस्त करावी, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ प्रदान करुन यथोचित गौरव करण्याची मागणी करणाऱ्या भाजपाला स्वतःची सत्ता असताना मात्र विसर पडला होता. फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकरांचंच नाव नव्हतं. त्यावर, सावरकरांचं नाव चुकून राहिलं असेल, असं लंगड समर्थन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. (Savarkar name missed in List of National Heroes)
मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या सामान्य प्रशासन विभागाकडून राष्ट्रपुरुष, थोर पुरुष यांची यादी जाहीर होते. त्यांची छायाचित्रं मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री आणि सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये लावणं बंधनकारक आहे. राष्ट्रपुरुषांच्या यादीतच नाव नसल्याने सावरकरांची तसबीर शासकीय कार्यालयांच्या भिंतीवरही नाही.
‘राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव असायलाच पाहिजे. ते चुकून राहिले असेल, तर या सरकारने ताबडतोब ही चूक दुरुस्त करावी, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी भाजपने किंती पत्र पाठवली, असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.
युती सरकारमध्ये शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी उचलून धरली होती. युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. सावरकरांबाबत काँग्रेसची भूमिका उघड असल्यामुळे शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप वेळोवेळी करताना दिसतं.
सावरकरांचं योगदान नाकारता येणार नाही : अजित पवार
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनीही सावरकरांचं योगदान नाकारता येणार नसल्याचं कबूल केलं. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या विनंतीनंतर सावरकरांच्या फोटोला पुष्पांजली अर्पण केली होती.
सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त 26 फेब्रुवारीला भाजपने विधिमंडळात सावरकर यांच्या गौरवाचा ठराव मांडण्याची मागणी केली होती. त्यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये बराच गोंधळही झाला. परंतु महाविकास आघाडी सरकारने ठराव तर मांडला नाहीच, परंतु दिवसभराचं कामकाजही उरकून घेतलं. (Savarkar name missed in List of National Heroes)