म्हसळा येथे स्विफ्ट कारचा भीषण अपघात, 3 जण जागीच ठार तर एक जण जखमी, मृतात 5 वर्षीय मुलाचा समावेश
अपघातग्रस्त गा़डीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले तेव्हा गाडीचा क्रमांक ओळखीचा असल्याचे समजताच म्हसळावासीय हादरले. गावकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरु केले. परंतू अपघात इतका भीषण होता की....
गोरेगाव श्रीवर्धन राज्य मार्गावरील खामगाव आणि कणघर हद्दीत हमरस्त्यावर गोरेगाववरुन म्हसळाला जात असताना स्विफ्ट कार चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन तीन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या अपघातातील मृतांत पाच वर्षांच्या लहान मुलांचाही समावेश असून सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने म्हसळावासियांत एकच खळबळ उडाली आहे. या स्विफ्ट कारचा चालकाने गाडी बेफान चालविल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
वाहन क्रमांक एमएच -06- ए.एन.2223 स्विफ्ट गाडीचा चालक म्हसळाकडे येत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर म्हसळा ग्रामीण रुग्णालयात जखमींची रवानगी करण्यात आली. परंतू या अपघातात चालक मोहम्मद रफीक शेख अंदाजे ( वय 34, रा.म्हसळा ), कृष्णा हरिशचंद्र कांबळे ( वय 45, रा. मेंददी ), मोहम्मद याचा मुलगा मुसा शेख ( वय 5 ) हे जागीच ठार झाले. चालक मोहम्मद रफीक शेख यांचा मोठा मुलगा ईसा महमद शेख गंभीर जखमी झाला असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
समाजमाध्यमावर फोटो व्हायरल
सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास स्विफ्ट कारचा म्हसळा- कणघर येथे अपघात झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हा ही कार म्हसळा येथील असल्याचे समजताच एकच हाहा:कार उडाला. अपघाताची माहिती मिळताच स्वयंसेवक नागरीक आणि पोलीसांनी गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले. जखमीला म्हसळा ग्रामीण रुग्णालयात हलविले. घटनास्थळी अपघाताची तीव्रता पहाता गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असे म्हटले जात आहे. या अपघात प्रकरणात म्हसळा आणि माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून पंचनामा आणि तपास सुरु केला आहे.