Cyclone in Maharashtra : सिंधुदुर्गला सर्वाधिक फटका, रस्ते बंद, बत्ती गुल, नेटवर्क गायब!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. वादळामुळे जवळपास 80 टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे.
सिंधुदुर्ग : तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. वादळामुळे जवळपास 80 टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसलळे आहेत. त्यामुळे मोबाईल सेवाही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोरोना रुग्णांसाठी योग्य उपाययोजना केल्याचं दिसून आलं आहे. (Tauktae Cyclone causes severe damage in Sindhudurg district)
चक्रीवादळाचा इशारा आधीच मिळाल्यामुळे प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. वीज गेली तर कोरोना रुग्णांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये जनरेटरची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे वादळाच्या तडाख्यात बत्ती गुल झाली असली तरी कोरोना रुग्णालयातील वीज सुरु आहे.
नांगरलेली बोट वाहून गेली
देवडच्या समुद्र किनाऱ्यावर नांगरुन ठेवलेली एक बोट वाहून गेल्याची घटना घडलीय. या बोटीत 7 जण होते. वादळामुळे आलेल्या लाटेत ही बोट समुद्रात वाहून गेली. बोटीतील तिघे पोहून किनाऱ्यावर परत आले. मात्र, एकाचा मृतदेह आढळून आला आहे. तर अन्य तिन जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात एका ठिकाणी भिंत कोसळून 10 मोटरसायकलचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.
12 हजार 420 नागरिकांचं स्थलांतर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवरील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणयात आलंय. तीन जिल्ह्यात मिळून एकूण 12 हजार 420 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
उरणमध्ये 2 महिलांचा मृत्यू
उरण परिसरात एक भिंत पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. उरणच्या बाजारपेठेत भिंत पडल्यानं भाजी विक्री करणारी महिला निता भालचंद्र नाईक आणि सुनंदाबाई भालचंद्र घरत यांचा मृत्यू झाला आहे. तर 800 पेक्षा जास्त घरांना आणि पत्र्याच्या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
संबंधित बातम्या :
Tauktae Cyclone causes severe damage in Sindhudurg district