Cyclone in Maharashtra : हजारो नागरिक स्थलांतरित, श्रीवर्धनच्या शाळेत एका खोलीत 30 ते 40 जण, कोरोना संसर्गाची भीती
चक्रीवादळापासून वाचण्यासाठी स्थलांतर केलं असलं तरी या स्थलांतरितांना कोरोना संसर्गाची भीती निर्माण झालीय.

श्रीवर्धन : तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरील हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय. चक्रीवादळामुळे जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली जात आहे. पण स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांवर ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, श्रीवर्धनच्या जिवना बंदर शाळेतील शरणार्थींना एका वर्गात 30 ते 40 जणांना ठेवण्यात आलंय. त्यामुळे चक्रीवादळापासून वाचण्यासाठी स्थलांतर केलं असलं तरी या स्थलांतरितांना कोरोना संसर्गाची भीती निर्माण झालीय. (In Shrivardhan, 30 to 40 citizens were kept in one room, possibility of corona infection)
श्रीवर्धनमधील शाळा क्रमांक 1, 3 आणि 7 मध्ये तसंच अन्य ठिकाणी 761 कुटुंबातील 1 हजार 158 नागरिकांना शिबिरार्थी कॅम्पमध्ये ठेवण्यात आलंय. पुरुष, महिला आणि मुलांना एकाच ठिकाणी दाटीवाटीनं राहावं लागत आहे. 2020 मध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही. यावेळी तरी आमच्या घरांच्या आणि बोटीच्या नुकसानाची पैसे मिळतील का? असा प्रश्न हे स्थलांतरित विचारत आहेत.
नुकसान भरपाईची मागणी
गेल्या वर्षीपासून लॉकडाऊन, चक्रीवादळामुळे मच्छिमारी करता आली नाही. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय. मच्छिमारीला गेलो नाही तर खलाशांचे पगार कुठून द्यायचे? वर्षभरात दुसऱ्यांदा चक्रीवादळाला सामोरे जात आहोत. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छिमारांनी केलीय.
12 हजार 420 नागरिकांचं स्थलांतर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवरील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणयात आलंय. तीन जिल्ह्यात मिळून एकूण 12 हजार 420 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
उरणमध्ये 2 महिलांचा मृत्यू
उरण परिसरात एक भिंत पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. उरणच्या बाजारपेठेत भिंत पडल्यानं भाजी विक्री करणारी महिला निता भालचंद्र नाईक आणि सुनंदाबाई भालचंद्र घरत यांचा मृत्यू झाला आहे. तर 800 पेक्षा जास्त घरांना आणि पत्र्याच्या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
संबंधित बातम्या :