आधी लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याला पकडून दिलं, आता त्याच शिक्षकावर जळगावात निलंबनाची कारवाई
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात भोटा गावच्या प्रयोगशील शिक्षकावर निलंबनाची कारवाई झालीय. या विरोधात शिक्षक संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात भोटा गावच्या प्रयोगशील शिक्षकावर निलंबनाची कारवाई झालीय. या विरोधात शिक्षक संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगेश ढेंगे असं या निलंबनाची कारवाई झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. “या शिक्षकाने लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडून दिलं होतं. यानंतर संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी दबावही आणण्यात आला. दबावाला बळी न पडता तक्रार मागे न घेतल्याने या शिक्षकांना फसवलं आहे,” असा आरोप केला जातोय (Teacher organizations and Social activist opposing action against teacher Mangesh Dhenge in Jalgaon).
मुक्ताईनगर तहसिलदारांनी मंगेश ढेंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करताना त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला आहे. ढेंगे यांची मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली नसताना ते तेथे हजर राहिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय अन्य एका नोटीसमध्ये तहसिल कार्यालयाने त्यांच्याविरोधात मतदारांना पैसे देऊन आमिष दाखवल्याची तक्रार दाखल झाल्याचं सांगत नोटीस बजावली होती. यावर निलंबित शिक्षक ढेंगे यांनी आपल्याला आपली बाजू मांडण्याचीही संधी दिली नसल्याचा आरोप केलाय.
निलंबनाच्या कारवाईवर शिक्षकाची भूमिका काय?
शिक्षक मंगेश ढेंगे यांनी सांगितलं, “निवडणूक काळात बीएलओ म्हणून काय काम करायचं याबाबत आम्हाला तहसिल कार्यालयाकडून सूचना येत असतात. अनेकदा या सूचना तोंडी स्वरुपाच्या असतात. जानेवारीमधील ग्रामपंचायत निवडणुकीत देखील आम्हाला तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याकडून मतदान केंद्रावर हजर राहण्याबाबत कळवण्यात आले. त्यानुसारच माझ्यासह तालुक्यातील माझे इतर बीएलओ सहकारी संबंधित मतदान केंद्रावर हजर होते.”
“माझ्याकडे सर्व पुरावे, पण बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही’
पैसे देऊन मतदारांना आमिष दाखवल्याच्या तक्रारीवर बोलताना मंगेश ढेंगे म्हणाले, “माझ्याविरोधात तक्रार देणाऱ्यांनी माझ्या शाळेच्या गावातील 3 अत्यंत गरीब लोकांना हाताशी धरले आणि त्यांना संबंधित कागद घरकुलाचे असल्याचं आमिष दाखवत तक्रारीवर सह्या घेतल्या. हाच कागद पुरावा म्हणून वापरत तहसिलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी तक्रारीत नमूद साक्षीदारांना समोर बोलावून विचारणा झालेली नाही. या प्रकरणात माझ्यावरील आरोपांबाबत माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मात्र, मला माझी बाजू मांडण्याची संधी न मिळताच कारवाई झाली आहे.”
लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याच्या नियुक्तीलाही ढेंगेंकडून विरोध
विशेष म्हणजे या शिक्षकाने लाच घेताना निलंबित झालेल्या शिक्षणाधिकाऱ्याची पुन्हा मुक्ताईनगरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याला विरोध केला होता. तसेच ही नियुक्ती रद्द करावी यासाठी लेखी मागणी प्रशासनाकडे केली होती. ही नियुक्ती रद्द न केल्यास सहकुटुंब उपोषणाला बसण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळेच मंगेश ढेंगे यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोपही होत आहे.
शिक्षक संघटनांची भूमिका काय?
मंगेश ढेंगे यांच्याविरोधातील निलंबनाच्या कारवाईविरोधात शिक्षक संघटना, बीएलओ शिक्षक आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत तहसिलदारांना पत्र लिहित ही कारवाई रद्द करण्याची मागणी केलीय. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे, “आम्ही मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना, शिक्षक आणि बीएलओ मंगेश ढेंगे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा निषेध करतो. ज्या शिक्षकाला आपल्याच कार्यालयाकडून सलग दोन वर्षे उत्कष्ठ बीएलओ पुरस्कार मिळाला त्यालाच सबळ पुरावे नसतानाही निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई अत्यंत चुकीची आणि आमच्या प्रामाणिकपणावर शंका निर्माण करणारी आहे.”
‘निलंबनाची कारवाई रद्द होत नाही तोपर्यंत बीएलओ पदावर सामूहिक बहिष्कार’
“प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर हजर राहावे की नाही याबाबत सर्व बीएलओंनी विचारणा केली होती. मात्र, कोणतेही मार्गदर्शन करण्यात आले नाही. त्यामुळे ढेंगे सरांसोबतच आम्ही सर्व बीएलओ शिक्षक निवडणुकीच्या दिवशी नेमून दिलेल्या कामासाठी मतदान केंद्रावर हजर होतो. त्यावर निलंबनाची कारवाई होत असले तर आमच्याकडील बीएलओचा कार्यभार त्वरित काढून आम्हाला कार्यमुक्त करावे. जोपर्यंत मंगेश ढेंगे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही बीएलओ पदावर सामूहिक बहिष्कार टाकतो,” अशी रोखठोक भूमिका बीएलओ शिक्षकांनी घेतलीय.
‘अशा कारवाईने स्वप्नाळू ध्येयवादी शिक्षक निराश होतील’
या प्रकरणावर बोलताना सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले, “महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित, अभय बंग यांच्या निर्माण चळवळीतील शिक्षक मंगेश ढेंगे (मुक्ताईनगर) यांना BLO च्या कामात अडकवून निलंबित करण्यात आलंय. अशाने स्वप्नाळू ध्येयवादी शिक्षक निराश होतील. या प्रकरणातील तपशील आणि या शिक्षकाची बाजू पुढे यायला हवी. सत्यता पडताळून मगच निर्णय व्हायला हवा, अशी विनंती मी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.”
“अगोदरच शिक्षक BLO च्या कामाने वैतागले आहेत. अशी प्रकरणे घडली तर शिक्षक ही कामे करतील का?” असाही सवाल हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केलाय. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनीही या प्रकरणी सखोल चौकशी करुन योग्य कारवाई करण्याची मागणी केलीय.
कोण आहेत मंगेश ढेंगे?
मंगेश ढेंगे हे एक प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी वर्ध्यातील महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित नई तालीम या शिक्षण पद्धतीनुसार आपल्या शाळेत अनेक प्रयोग राबवले आहेत. विद्यार्थी केंद्री शिक्षणासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विशेष प्रयत्न केलेत. ‘नई तालीम’ आधारित जीवन शिक्षण देण्याबद्दलच्या याच कामाची दखल घेत 15 दिवसांपूर्वीच मंगेश ढेंगे यांच्या शाळेची नॅशनल पोर्टलला निवड झालीय.
मंगेश ढेंगे यांनी शाळेतील पालकांचा सहभाग वाढवण्यासाठीही विशेष प्रयत्न केलेत. माझे गाव, माझी शाळा म्हणून व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी पालकांना शेतीविषयक उपयोगी माहिती देतानाच आपल्या पाल्यांच्या शालेय प्रगतीचीही माहिती दिली. त्यांच्या पुढाकारातून भोटा येथील शाळेत अनोख्या उबंटू गार्डनचीही निर्मिती करण्यात आलीय. या गार्डनमध्ये मियावाकी या जपानी पद्धतीने 30 चौरस मीटरमध्ये 18 प्रजातीची 60 झाडे लावण्यात आली आहे.
ढेंगे यांनी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाला व्यवहारिक शिक्षणाची जोड देत विद्यार्थ्यांची बँकही सुरु केलीय. याचं सर्व काम विद्यार्थी पाहतात. त्यामुळे बँक ठेव, कर्ज, व्याजदर, बैठका, व्यवस्थापन यातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींची समज तयार होते. या प्रयोगाने मुलांमध्ये आर्थिक स्वावलंबन, निर्णय क्षमता अशा अनेक गोष्टींचा विकास होतोय. याशिवाय विद्यार्थी वस्तू भंडार चालवत स्वस्त दराने शालेय साहित्य उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यास संधी देत मासिक चालवणे, वाचनालय चालवणे असे अनेक उपक्रम त्यांच्या नेतृत्वात राबवले जात आहेत.
याशिवाय ते बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणूनही काम करतात. त्यांना बीएलओ म्हणून उत्कृष्ट कामासाठी तहसिल प्रशासनाने दोनदा सन्मानितही केले आहे.
हेही वाचा :
जलतरणाचे धडे गिरवणारा शिक्षक अवलिया, 3200 मीटरचं अंतर अवघ्या 2 तास 20 मिनिटात पार
अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा
व्हिडीओ पाहा :
Teacher organizations and Social activist opposing action against teacher Mangesh Dhenge in Jalgaon