मुलांना उत्तम शिकवता यावे म्हणून शिक्षकांकडून स्वतःहून 25 सुट्ट्यांचा त्याग
आपल्या सुट्ट्यांसाठी आग्रही असणारे शिक्षक आपण नेहमीच पाहतो. मात्र, अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेच्या शाळेतील शिक्षक याला अपवाद ठरले आहेत.
अहमदनगर : आपल्या सुट्ट्यांसाठी आग्रही असणारे शिक्षक आपण नेहमीच पाहतो. मात्र, अहमदनगरमधील स्नेहालय (Snehalaya) संस्थेच्या शाळेतील शिक्षक याला अपवाद ठरले आहेत. शाळेतील मुलांच्या विकासासाठी वेळ कमी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्नेहालय संस्थेतील शिक्षकांनी स्वतःहून आपल्या 25 सुट्ट्यांचा त्याग केला आहे.
गरीब, अनाथ आणि एचआयव्ही संसर्गित मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या स्नेहालय या संस्थेने नुकतीच (दि. 10 जून ते 16 जून) पुण्यातील ‘वोव्हेल्स ऑफ दि पिपल असोसिएशन’ (VOPA) या संस्थेची विशेष कार्यशाळा आयोजित केली होती. यात स्नेहालयातील शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापक आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. स्नेहालयातील मुलांमध्ये मूल्यांची रुजवणूक व्हावी, मुलांना आनंदी शिक्षण पध्दतीने शिकता यावं, असा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता. नियोजनाचे महत्व समजून घेत लोकशाही पद्धतीने शिक्षकांचे/शाळेचे वार्षिक नियोजन करणे आणि जबाबदाऱ्यांचे वाटप करणे याच्यावरही यावेळी भर देण्यात आला.
कार्यशाळेत शाळेतील मुलांच्या विकासासाठी वेळ कमी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी स्वतःहून आपल्या 5 शासकीय सुट्ट्या कमी करून घेतल्या. शाळेचा दैनंदिन कामाचा वेळ देखील स्वतःहून वाढवला. तसेच वर्षभरातील किमान 20 रविवार (प्रति महिना 2 रविवार) कामावर येऊन मुलांना अधिक चांगले शिकवण्याचा निर्णय घेतला.
सुट्ट्या कमी करण्याच्या निर्णयावर शिक्षकांच्या प्रतिक्रिया
मुलांना शिकण्यासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून आम्ही स्वतःहून आमच्या 5 शासकीय सुट्ट्या कमी केल्याची प्रतिक्रिया स्नेहालयमधील शिक्षकांनी व्यक्त केली. “या कार्यशाळेत जे सत्र झाले त्यातून संपूर्ण वर्षभरात माझी काय जबाबदारी असेल? ती प्रभावी करण्यासाठी मला कुठली जास्तीची तयारी करावी लागेल? याचा विचार करण्यासाठी वाव मिळाला. सत्रात मुलांच्या विकास आणि गरज यांच्याकडे लक्ष दिले गेले. त्यामुळे वेळेचे खूप चांगले नियोजन झाले”, असेही मत कार्यशाळेत सहभागी शिक्षकांनी व्यक्त केले.
‘स्कुल स्ट्रेंथनिंग प्रोग्राम’ (School Strengthening Program) अंतर्गत घेतलेल्या या कार्यशाळेची मुख्य जबाबदारी वोपा (vopa.in) संस्थेचे प्रमुख प्रफुल्ल शशिकांत, आकाश भोर, ऋतुजा जेवे, अश्विन भोंडवे यांनी पार पाडली. स्नेहालय संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, अनिल गावडे, संजय चाबुकस्वार यांचाही या कामात महत्त्वाचा सहभाग राहिला.