भाजपविरोधात तेली समाजाची खदखद, बावनकुळेंचं तिकीट कापल्यावरुन नाराजी
भाजपनं बावनकुळेंचं तिकीट कापून तेली समाजाचं नाक कापलं, अशी भावना तेली समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नागपूर : माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलं होतं. त्यावरुन तेली समाज भाजपवर चांगलाच नाराज आहे. तेली समाजाची हीच खदखद नागपुरातील तेली महासंघाच्या कार्यक्रमात बाहेर पडली. भाजपनं बावनकुळेंचं तिकीट कापून तेली समाजाचं नाक कापलं, अशी भावना तेली समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे तेली समाजाची ही नाराजी चंद्रशेखर बावनकुळे आणि रामदास तडस यांच्यासमोरच बाहेर पडली.(Teli community is angry with BJP over the cancellation of Bavankule’s ticket)
चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकीट कापून भाजपनं तेली समाजाचं नाक कापलं. बावनकुळेंचं तिकीट कापल्यामुळे भाजपच्या 14 जागा हरल्या. तेली समाजाने भाजपला धडा शिकवला. बावनकुळे यांचं तिकीट कापल्यामुळे तेली समाजाची भाजपवरील नाराजी अद्यापही कायम असल्याचं तेली महासंघाचे महासचिव भुषण कर्डीले यांनी व्यक्त केलं आहे. नागपुरात तेली महासंघाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी तेली समाजाची ही नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली.
भाजपचं धक्कातंत्र
2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं धक्कातंत्राचा वापर करुन अनेक बड्या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. त्यात विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश होता. कामठी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी भाजपनं टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी बावनकुळे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण तिही फोल ठरली.
बावनकुळे हे नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंकडे आधी महत्वाचं ऊर्जा खातं दिलं होतं. नंतर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे राज्य अबकारी खातंही सोपवण्यात आलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं गेल्याची चर्चा होती. पण स्वत: बावनकुळे यांनीच पक्षात फडणवीस-गडकरी असा कुठलाही वाद नसल्याचं म्हटलं होतं. तसंच आपल्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आल्यामुळं तिकीट कापलं गेलं असेल, असंही त्यावेळी बावनकुळे म्हणाले होते.
वीज बिलाच्या मुद्द्यावरुन बावनकुळे आक्रमक
शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. या नोटीसा मागे घ्या अन्यथा येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यात एमएसएईबीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. राज्यात एमएसईबीच्या साडेसातशे मंडळांवर टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
संबंधित बातम्या :
5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीवर ‘टाळे ठोको’ आंदोलन; भाजप देणार आघाडी सरकारला शॉक
Teli community is angry with BJP over the cancellation of Bavankule’s ticket