Nashik | काळजाचे तुकडे करणारा अपघात; पालक चिमुकल्याला दुचाकीवर सोडून शॉपिंगला, तोल जावून रस्त्यावर पडला, अन्….
आपल्या डोळ्यांसमोर आपल्या काळजाचा तुकडा असा क्षणार्धात नियतीने खुडून न्यावा आणि आपण जवळ असूनही आपला साधा हातही त्याच्यापर्यंत पोहचू नये हे भयंकर असते. अगदी तसेच इथे घडले.
लासलगावः तुम्हाला प्रचंड भीती वाटते, नकारात्मक बातमी वाचायचीच सवय नाही, तर बिल्कुल ही बातमी पुढे वाचूच नका. कारण घडलेच आहे इतके भयंकर की, ते वाचून कुणीही हळहळेल आणि कुणाचाही जीव वेदनेने तडफडेल. अपघात झालाच तसाय. विशेष म्हणजे या भीषणतेत एका चिमुकल्याला त्याचा काहीही दोष नसताना जीव गमावावा लागलाय. हे अगदी कोणासोबतही होऊ शकते. तुमच्यासोबतही. त्यामुळे जरूर दक्षता घ्या…
नेमके झाले काय?
ही घटना आहे 2 डिसेंबरची. बरोब्बर दुपारी 3 वाजून 35 मिनिटे झालेली. एक जोडपे खरेदीसाठी बाहेर पडलेले. त्यांच्यासोबत एक चिमुकलाही होता. बहुतेक त्यांची सारी खरेदी झालेली. घराकडे जाताना एखादी वस्तू अथवा काही राहिल्याचे लक्षात आले असावे. ते अतिशय घाईघाईत होते. त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली दुचाकी लावली. घाईघाईने दोघेही दुकानाकडे निघाले. चिमुकल्याला त्यांनी एकट्यालाच दुचाकीवर ठेवलेले. मात्र, इथेच घात झाला. ही भयंकर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दुचाकी कलंडली
चिमुकल्याचे आई-वडील दुकानात सामान खरेदी करत होते. चिमुकलाही गाडीवर एकटा बसलेला. मात्र, त्याचा अचानक तोल गेला. त्याला काही कळालेच नाही. त्यात झाले असे की, दुचाकीही रस्त्यावर कलंडली. दोघेही रस्त्यावर पडले. हे दुकानात असलेल्या पालकांनी पाहिले. त्यांनी तातडीने चिमुकल्याला उचण्यासाठी वेगाने दुचाकीकडे धाव घेतली. मात्र, रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरूच होती. एका भयंकर वेगात आलेल्या हायवा या अवजड ट्रकचे मागील चाक या चिमुकल्यावरून गेले.
क्षणार्धात संपले, पालकांना धक्का
आपल्या डोळ्यांसमोर आपल्या काळजाचा तुकडा असा क्षणार्धात नियतीने खुडून न्यावा आणि आपण जवळ असूनही आपला साधा हातही त्याच्यापर्यंत पोहचू नये हे भयंकर असते. अगदी तसेच इथे घडले. आई-वडिलांनी टाहो फोडला. त्यांचा आकांत पाहून परिसरातील अनेकजण जमा झाले. मात्र, काळ आलेला होता आणि वेळही आलेली होती. आता हाती फक्त शोक करणे बाकी होती.
तुम्ही ही चूक कधीच करू नका…
तुम्ही खरेच बातमी शेवटपर्यंत वाचली असेल, तर तुम्हाला समजले असेलच, आपल्याला ही चूक कधीही करायची नाही. मग भले तुम्ही पालक असा की, आणखी कोणी. आपल्यासोबत एखादे लहान मुल प्रवासात असेल, तर त्याला नेहमी सोबत ठेवा. त्याचा हातही सोडू नका. कारण या धकाधकीच्या जीवनात आयुष्य इतके क्षणभंगुर झाले आहे की, कधी काय होईल, कशाचाही नेम नसतो.
इतर बातम्याः
Vijeta | भूमिकेसाठी कायपण! अभिनेत्री प्रीतम कागणेने ‘विजेता’ चित्रपटातील भूमिकेसाठी घटवले वजन!