सांगलीमध्ये भीषण अपघात, कार कृष्णा नदीत कोसळून मोठी दुर्घटना, कुटुंब जाग्यावर संपलं
सांगलीमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चारचाकी पुलावरून कृष्णा नदीत कोसळली, या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सांगलीमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चारचाकी पुलावरून कृष्णा नदीत कोसळली, या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. उदगाव येथील सांगली -कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून ही चारचाकी नदीत तब्बल 180 फूट थेट खाली कोसळली. या अपघातामध्ये वाहनाचं देखील मोठं नुकसान झालं असून गाडीचा चक्काचूर झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून सांगलीकडे जाणारी i10 ग्रँड व्हाईट कलरची गाडी क्रमांक MH 10 DG 4385 ही गाडी पुलावरून सुमारे 180 फूट थेट खाली कोसळली, या अपघातात सांगलीच्या पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले आहेत.पती प्रसाद भालचंद्र खेडेकर वय ३५ व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वय ३६ दोघे रा.मारुती रोड गाव भाग सांगली, व वैष्णवी संतोष नार्वेकर वय २१ रा.आकाशवाणी केंद्र जवळ सांगली अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. तर या अपघातामध्ये आणखी तीन जण गंभीर जाखमी झाले आहेत. समरजीत प्रसाद खेडेकर वय ७, वरद संतोष नार्वेकर वय १९ व साक्षी संतोष नार्वेकर वय ४२ सर्व रा.सांगली अशी जखमी व्यक्तींची नावं आहेत.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीसांनी धाव घेऊन जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं हलवले, तसेच मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अपघात चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे, अपघाताची माहीती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताबाबत अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.