मोठी बातमी! तेलंगणामध्ये कारचा भीषण अपघात; मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचा मृत्यू
मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या पोर्ट झोनमध्ये पोस्टिंग असलेले पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये हा अपघात झाला.

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या पोर्ट झोनमध्ये पोस्टिंग असलेले पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ते हैदराबादला ट्रेनिंगसाठी गेले होते. त्यानंतर ते आज आपल्या एका नातेवाईकासोबत ज्योतिर्लिंग श्रीशैलमच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातामध्ये सुधाकर पठारे आणि त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आयपीएस सुधाकर पठारे तेलंगणाच्या श्रीशैलमहून नगरकुरलुनकडे निघाले होते. याचदरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकाचा देखील मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे ज्या कारने प्रवास करत होते, ती कार ट्रकला धडकली या भीषण अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होतं आहे.
सुधाकर पठारे हे अहमदनगर जिल्ह्यातील वळवाने गावचे रहिवासी होते. आयपीएस होण्यापूर्वी त्यांनी विविध विभागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून काम केलं होतं. सुधाकर पठारे यांनी एमएस्सी अॅग्री आणि एलएलबीची पदवी देखील मिळवली होती. 1995 साली स्पर्धा परीक्षेत यश मिळून ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक बनले होते. त्यानंतर 1996 साली सेल्स टॅक्स विभागामध्ये ते क्लास वन ऑफिसर झाले. 1998 मध्ये त्यांची निवड पोलीस उपाधीक्षकपदी झाली. त्यानंतर ते 2011 ला आयपीएस बनले.
आतापर्यंत सुधाकर पठारे यांनी पंढरपूर अकलूज, कोल्हापूर शहर आणि राजुरा या ठिकाणी पोलीस उपाधीक्ष म्हणून देखील काम केलं. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईमध्ये होती. मात्र अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे. दरम्यान मिलिंद नार्वेकर यांनी सुधाकर पठारे यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. ‘आयपीएस सुधाकर पठारे जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त दुःखद आहे. पठारे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.भावपूर्ण श्रद्धांजली’ असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.