ठाण्यातील ‘या’ नेत्याला एकनाथ शिंदे यांच्याकडील नेतेपद; ‘ज्या ताटात खाल्लं त्या ताटातच…’
ठाण्यातील असंख्य शिवसैनिक संघर्षाच्या काळात माझ्या पाठीशी उभे राहिले. युवा सैनिक, महिला पदाधिकारी आज माझ्यासोबत आहेत. जोपर्यंत ठाण्यावर पुन्हा भगवा झेंडा लागत नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत माझा संघर्ष चालू राहणार असे ते म्हणाले.
ठाणे : 16 ऑक्टोबर 2023 | ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव नेता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मात्र, त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. निवडणूक आयोगाने शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिले. त्यामुळे आपसूक शिवसेनेचे प्रमुखपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांना आमदारकीची संधी देण्यात आली. शिवसेनेचे नेते पद देण्यात आले. मात्र याच नेतेपदावर आता एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी असलेले खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आलीय.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार राजन विचारे यांची नेतेपदी नियुक्ती केलीय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नियुक्ती पदे जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत, राज्यसभा सदस्य अनिल देसाई, माजी मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर. आमदार सुनील प्रभू यांचीही नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल खासदार राजन विचारे यांचा ठाण्यात सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्हा शाखेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने नेते राजन विचारे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आज माझी शिवसेना नेते म्हणून निवड केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा लागणार नाही. एक सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, महापौर, आमदार, दोनदा खासदार ही संधी कोणामुळे मिळाली? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला हे पद मिळालं असे राजन विचारे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना नेते पद कुणी दिलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही असे एकनाथ शिंदे हे आमच्या साहेबांना म्हणतात. पण, मला वाटतं की त्यांनाच चैन पडणार नाही. ते बरोबर आहे कारण त्यांची चैन त्यांच्यामध्येच आहे. ज्या ताटात खाल्लं त्या ताटातच आज ते घाण करायला लागले आहेत. ज्यांच्यामुळे नगरसेवक झाला. ज्यांच्यामुळे तुम्हाला सभागृह नेते पद मिळालं, तुम्हाला आमदारकी मिळाली. पालकमंत्री पद मिळालं. ज्यांच्यामुळे तुम्ही नेता झालात असा टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.
जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल
एवढी वर्ष तुम्हाला शिवसैनिक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जो विश्वास टेवला. तुमच्यावर अख्ख्या ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिली. तुम्ही जर असा विश्वासघात करत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रात नक्कीच निवडणुका घेऊन दाखवा. तुम्हाला ही जनता तुमची जागा दाखवते की नाही ते बघा, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
मराठा आरक्षण अजून मिळत नाही?
एक सामान्य आपला मराठा समाजाचा जरांगे आज ज्यापद्धतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. मराठी समाजासाठी तो न्याय मागतोय. तो न्याय मागत असताना शांततेच्या मार्गाने चाललेला आहे असे असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामध्ये कित्येक लोक जखमी झाले. तेथे फायरिंगसुद्धा झाले. जर शांततेच्या मार्गाने सुद्धा आंदोलन करत असेल तरीसुद्धा हे आंदोलन मोडून टाकण्याचा काम हे करत असतील तर त्याला या निवडणुकीत मराठा समाज काय आहे ते दाखवेल, असे इशाराही राजन विचारे यांनी दिला.