‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडलं’; ठाकरे गटाच्या नेत्याने सीमावादाचं राजकारणाचं मूळ सांगितलं…
कर्नाटकमध्ये ज्या प्रमाणे महाराष्ट्रविरोधी ठराव पास करण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही हिवाळी अधिवेशनामध्ये सीमावासियांच्या पाठिशी राहणारा असा ठराव पास करून कर्नाटकला अद्दल घडवावी असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
कोल्हापूरः सीमावादावर तोडगा निघण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी सीमावादावर चर्चा करून हा वाद मिठवण्याचे अश्वासन दिले होते. त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी सीमावादावर चिथावणीखोर वक्तव्य आणि ट्विट करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. हा वाद सुरू असतानाच कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राला कर्नाटकची एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असा ठराव विधानसभेत करण्यात आला.
त्याच बरोबर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जहरी टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
तसेच ते देशद्रोही असून ते चीनचे हस्तक असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यानी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
बसवराज बोम्मई यांच्यावर टीका करताना, संजय पवार म्हणाले की, काही दिवसांनी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव होणार आहे.
त्यामुळे नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊत यांच्यावर आणि सीमावादाविषयी वादग्रस्त टीका केली जात असल्याची टीका संजय पवार यांनी केली आहे.
कोल्हापूरचे नेते संजय पवार यांनी बोम्मई यांच्यावर टीका करताना त्यांनी सीमावाद हा न्यायालयात प्रलंबित असतानाही त्यांनी त्याविषयी विधानसभेत कसा ठराव पास केला असा सवाल केला आहे. त्यामुळे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकमध्ये ज्या प्रमाणे महाराष्ट्रविरोधी ठराव पास करण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही हिवाळी अधिवेशनामध्ये सीमावासियांच्या पाठिशी राहणारा असा ठराव पास करून कर्नाटकला अद्दल घडवावी असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांच्याबद्दल शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी कानशिलात लगावण्याची भाषा केली होती. त्यामुळे त्यांच्यावरही गृहखात्याने कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी केली आहे.