एकनाथ शिंदे शपथविधीला उपस्थित राहणार की नाही?; संजय राऊत काय बोलून गेले?
एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी पोहचले. मात्र गावी असताना त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे.
Sanjay Raut On Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर अद्याप मुख्यमंत्री कोण? हे निश्चित झालेले नाही. त्यातच शिवसेना नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला महायुतीच्या बैठकीसाठी गेले होते. या बैठकीनंतर त्यांनी गृहमंत्रिपदावर दावा केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. त्यातच शनिवारी एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी पोहचले. मात्र गावी असताना त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती समोर आली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. आता या शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थितीत राहणार का? याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन आता संजय राऊतांनी एक वक्तव्य केले आहे. ५ डिसेंबरला ते शपथविधीसाठी येणार आहेत का की त्यांना हवाई रुग्णवााहिकेतून त्यांना यावं लागेल, असे संजय राऊत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे आजारी, शपथविधीसाठी येणार का?
“एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. त्यांच्याविषयी काहीही वेडवाकडं बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. त्यांच्या हाताला पट्टी लावली आहे. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले, त्यांनाही ते भेटले नाही. म्हणजे त्यांची किती प्रकृती गंभीर आहे. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही त्रास देऊ नका. ५ डिसेंबरला ते शपथविधीसाठी येणार आहेत का की त्यांना हवाई रुग्णवााहिकेतून त्यांना यावं लागेल. अशा चिंतेत अनेक लोक आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस ते काम करत असतील तर चांगली गोष्ट
“त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते. पण त्यांना डॉक्टर की मांत्रिकाची जास्त गरज आहे. हा मांत्रिक अमित शाह की मोदी पाठवणार आहेत. यांच्या अंगातील जी भूत संचारली आहेत. ती आता उतरवायला हवीत आणि जर ते काम देवेंद्र फडणवीस करत असतील तर चांगली गोष्ट आहे”, असेही संजय राऊतांनी सांगितले
एकनाथ शिंदेंच्या हातात काहीही नाही
“शिंदेंना गृह आणि महसूल खातं हे ते ठरवणार आहेत का का ते ठरवू शकतात का नाही. हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ठरवणार यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि त्यांनी काय चघळायचं. एकनाथ शिंदेंच्या हातात काहीही नाही. त्यांच्याकडे फक्त रुसवे फुगवे आणि मग शरणागती यापलीकडे काहीही नाही. तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी स्वाभिमानाच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला होता”, असेही संजय राऊत म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली शपथविधीची तारीख
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रात्री उशिरा एक ट्वीट केले होते. यात त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा कधी होणार याबद्दलची संपूर्ण माहिती दिली होती. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.