“माझ्यासारखा सभ्य माणूस नाही”; विरोधकांना संजय राऊत यांनी आपल्या स्टाईलनं उत्तर दिलं…
अमरावतीचा बच्च कडू जेव्हा मराठवाड्यात गेला त्यावेळी तिथंसुद्धा लोकांनी त्यांना गद्दार आणि डाकू लोकांच्यात तुम्ही सहभागी झाला आहात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूरः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला आता आणखी बळ मिळाले आहे. कारण संजय राऊत कोल्हापूरला आल्यापासून शिवसेनेतील बंडखोर आमदारांबरोबरच खासदारांवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले धैर्यशील माने यांचे नाव कुणी ठेवलं आहे. त्यांच्या नावातील धैर्य या शब्दाचा तो अपमान असल्याचा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका करताना त्यांनी उपस्थित असलेल्या लोकांना विचारत गद्दार आमदार कोण आहेत असं विचारल्यानंतर लोकांनीही बंडखोर आमदार आणि खासदारांचा समाचार घेतला.
सभागृहातील उपस्थित लोकांनी बंडखोर आमदार आणि खासदार यांच्याविरोधात जोरदार टीका केल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ही भाषा आता लोकं वापरत आहेत. मात्र विरोधक म्हणतात की, मी असभ्य भाषा वापरतो आहे.
मात्र मी अशी भाषा वापरत नाही, कारण माझ्यासारखा सभ्य माणूस नाही. मी एक संपादक आहे. माझं मला भान ठेवलं पाहिजे असंही त्यांनी उपरोधिकपणे विरोधकांना उत्तर दिले आहे.
शिवसेनेतील आणि भाजपमधील मंत्रिमंडळासाठी मी चोरमंडळ हा शब्द वापरला. मात्र त्यानंतर त्यांनी माझ्यावर हक्कभंगाची कारवाईसाठी प्रयत्न केला.
मात्र त्यानंतर लोकं म्हणू लागली की, त्यांना तुम्ही चोरमंडळ का म्हणता, तुम्ही चोरांचा अपमान करत आहे. तुम्ही त्यांना दरोडेखोर म्हणा असाही टोलाही त्यांनी लगावला आहे.
मात्र त्यांना चोर म्हणणेही आता चुकीचे ठरवले जात आहे. कारण चोराकडेसुद्धा दिलेला शब्द आणि निष्ठा असते. मात्र चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोराने एकादा शब्द दिला तर तो मोडणार नाही कधी, कारण चोरही शब्दाला पक्के असतात अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
त्यांना दरोडेखोर, डाकू म्हणा, गुंड सुद्धा शब्द पाळतो मात्र हे गद्दार शब्द पाळणार नाहीत त्यामुळे मी चोरांचा अपमान झाल्याबद्दल मी आज चोरांची माफी मागतो असा खोचक टोला संजय राऊत यांनी बंडखोर यांना लगावला.
मात्र तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरला, तुम्ही शिवसेना नाव चोरलं, तुमची लायकी तर आहे का हे शिवसेना आणि धनुष्यबाण सांभाळण्याची अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावरही जोरदार टीका केली.
अमरावतीचा बच्च कडू जेव्हा मराठवाड्यात गेला त्यावेळी तिथंसुद्धा लोकांनी त्यांना गद्दार आणि डाकू लोकांच्यात तुम्ही सहभागी झाला आहात असंही त्यांनी यावेळी सांगितले.