EXPLAINER : शिवसेना विरुद्ध शिवसेना, या पाच मतदारसंघात जनतेचा कौल ठाकरे की शिंदे यांच्या शिवसेनेला?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 8 लोकसभा उमेदवारांची यादी घोषित केली. या यादीवर एक नजर टाकली तर किमान 5 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली स्थापन केलेल्या शिवसेनेचे दोन भाग पडले. शिवसेनेच्या आतापर्यतच्या इतिहासात अनेक बंड झाली. अनेकांनी पक्ष सोडला. मात्र, शिवसेना हा पक्ष म्हणून एकच राहिला होता. ‘एक नेता, एक मैदान’ ही शिवसेनेची ओळख राज्यात नव्हे तर देशभरात झाली होती. मात्र, याच शिवसेनेच्या आता दोन शिवसेना झाल्या. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने दिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलेला निर्णय हा शिवसेनेला झटका होता. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा दोन शिवसेना आता राज्यात तयार झाल्या आहेत. या दोन्ही शिवसेना आता आगामी लोकसभा निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी 17 तर एकनाथ शिंदे यांनी 8 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलीय. यातील 5 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढत होणार आहे. यातील पहिला मतदारसंघ आहे तो दक्षिण मध्य मुंबई.
शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यावर त्यांच्याकडे 2022 मध्ये लोकसभेत शिवसेनेचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे अनिल देसाई रिंगणात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल देसाई हे शिवसेनेचे सचिव, नेते आहेत. निवडणूक, कायदेशीर बाबी आणि व्यवस्थापन यात त्यांचा हातखंडा आहे. 2012 मध्ये ते राज्यसभेवर पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर पुन्हा 2018 साली ते राज्यसभेवर निवडून आले. दक्षिण मध्य मुंबईतील दोन्ही उमेदवारांना संसदीय कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे.
अखेर… शिर्डी शिंदे गटाकडेच, मनसेचे काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ मनसेसाठी मागितले होते अशी चर्चा होती. याशिवाय महायुतीमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही शिर्डी मतदारसंघावर दावा सांगितला होता. मात्र, येथे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे या दोन वेळा विजयी झालेल्या विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आली आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाने आपले जुने खिलाडी भाऊसाहेब वाकचौरे यांना येथून उमेदेवारी दिली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची 2008 मध्ये पुनर्रचना झाली. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यावेळी ते विजयी झाले होते. पण, 2014 च्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेने तिकीट दिल्यामुळे नाराज झालेले भाऊसाहेब कॉंग्रेसमध्ये गेले. त्यांनी त्या पक्षातून निवडणूक लढविली. पण, ते पराभूत झाले. आता शिवसेना पक्षात दोन गट पडले. त्यामुळे भाऊसाहेब यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली. शिर्डीकरांनी 2009 पासून येथून शिवसेना उमेदवाराला जिंकून दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिर्डीकर कोणत्या शिवसेना उमेदवाराला विजयी करतात याची उत्सुकता आहे.
मावळमध्ये अजितदादांचे खास उमेदवारी मात्र ठाकरे गटाकडून
2014, 2019 असे दोन वेळा लोकसभेमध्ये मावळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केलीय. वाघेरे हे अजितदादा यांचे खंदे समर्थक आहेत. अजितदादा यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याआधी दोन वेळा डावलण्यात आलेले वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रव्र्ष केला. बारणे शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला येथे योग्य उमेदवाराची गरज होती ती वाघेरे यांच्या रूपाने पूर्ण झाली. वाघेरे हे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे महापौर होते, तर, त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.
हिंगोलीमध्ये मराठा कार्ड चालणार का?
आरोग्य अधिकारी यांना शौचालय साफ करायला लावणारे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदारकीचा राजीनामा देणारे हेमंत पाटील हे राज्यभर चर्चेत आले होते. हेमंत पाटील हे 2014 मध्ये नांदेड दक्षिणचे आमदार होते. तर, 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेचे विजयी उमेदवार म्हणून लोकसभेत हिंगोलीचे प्रतिनिधित्व केले आहे. हेमंत पाटील यांच्या नावाला भाजपचा तीव्र विरोध होता. उमेदवारीवरून महायुतीत मोठा संघर्ष झाला. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळवून दिली.
हेमंत पाटील यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथून ठाकरे गटाने तगडा उमेदवार दिला आहे. नागेश पाटील आष्टीकर यांच्या रूपाने हेमंत पाटील यांच्यासमोर ठाकरे गटाने आव्हान निर्माण केलंय. माजी आमदार नागेश पाटील हे नांदेड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेल्या नागेश आष्टीकर यांनी हिंगोलीत शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले आहे. हिंगोलीच्या जनतेने कोणत्याही एका पक्षाच्या उमेदवाराला येथे सलग विजयी केलेले नाही. त्यामुळे ही परंपरा येथील जनता खंडित करणार की ठाकरे गटाच्या आष्टीकर यांना लोकसभेत पाठविणार हा प्रश्न आहे.
बुलडाणामध्ये प्रतापराव जाधव की नरेंद्र खेडेकर?
2009 पासून सातत्याने बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा या निवडणुकीत पराभव करण्याच्या उद्देशाने ठाकरे गटाने प्रा. नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिलीय. खासदार प्रतापराव जाधव हे सलग चौथ्यांदा निवडणूक लढविणार असले तरी त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांचे आव्हान असणार आहे. खेडेकर यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली. मात्र, मधल्या काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रव्रेश केला होता. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदही भूषवलं. मात्र, तीन वर्षापूर्वीच खासदार प्रतापराव जाधव यांनी खेडेकर यांना स्वगृही आणलं होते. परंतु, प्रतापराव जाधव हे शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे ठाकरे गटाचे जिल्हा नेतृत्व खेडेकर यांच्याकडे आले. तेच, खेडेकर आता जाधव यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.