तुम्हाला कसलं फ्रस्ट्रेशन आलंय ? मतदारांना वाट्टेल ते बोलणारे संजय गायकवाड, अजित पवारांवर भडकले संजय राऊत
आपल्याला मतदान कमी मिळाले यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी खंत व्यक्त केली. जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर भडकले. त्यांनी मतदारांना शिवीगाळ केली, त्याचा समाचार घेताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहील कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल, सत्ताधारी पक्षाचे आमदारचं अशी वक्तव्य करत असतील तर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. 2-2 हजारांना मतदार विकत घेतले , मतदारांना उद्देशून असं अश्लील बोलणं, वेश्या म्हणणं यावर विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर कसं ओझं होतंय, कसा भार आहे, हे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नुकतेच बोलले . म्हणजे 1500 रुपये देऊन तु्म्ही मतं विकत घेतली, पण आता तुम्हाला सरकारी योजनेवर भार टाकणं जमत नाहीये, राज्य चालवता येत नाही, हे स्पष्ट दिसतंय असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
आमदार संजय गायकवाड यांचा जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला मतदान कमी मिळाले यामुळे खंत व्यक्त केली. जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर भडकले. त्यांनी मतदारांना शिवीगाळ केली, तर अजित पवार यांनी मतदारांना उद्देशून काही वक्तव्य केलं होतं. त्या सर्वांचा समाचार घेताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य अतिशय गंभीर आहे. मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल,तर त्यांचे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. मी तुमचा गुलाम आहे का, सालगडी आहे का ? असं अजित पवार म्हणत आहेत. हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय ? हे राज्याला समजू दे असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र डागलं.