ठाणे : ठाण्यातील (Thane) वागळे इस्टेट परिसरातील अंबिकानगरमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळत आहे. अंबिकानगरमध्ये असलेल्या झोपडपट्टीत (Slum Area) मोठी आग लागली आहे. रात्री 10 च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी 5 ते 6 गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आलीय. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवान घटास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आगीचं रौद्ररुप आणि चिंचोळ्या गल्ल्यांमुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वागळे इस्टेट परिसरात रोड नंबर 29 मध्ये प्लॉट नंबर A-202 मध्ये ही आग लागली आहे. ही आग खूप भीषण असल्याचं कळतंय. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागली त्या ठिकाणी 5 ते 6 गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. या ठिकाणाहून स्फोटाचा मोठा आवाज आला. त्यामुळे ही आग अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार घटनास्थशावर महावितरण, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पोलीस कर्मचारी, पोलीस यंत्रणा, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या, 2 वॉटर टँकर दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याची शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग झोपडपट्टीत लागल्यामुळे ती अधिक पसरण्याची भीती व्यक्त केली जातेय.
विरार पूर्व येथील मनवेल पाडा परिसरात संत नगरमध्ये रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये आठ ते 10 दुकानं जळून खाक झाली. शुक्रवारी मध्यरात्री साडे बाराच्याच्या सुमारास अचानक आग लागली. लाकडी फर्निचर आणि कापसाच्या गाद्या असल्याने काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं. बघता बघता सर्व दुकानें जळून खाक झाली होती. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदरची दुकाने ही रस्त्याच्या कडेला होती. त्याशेजारी रहिवाशी इमारतीदेखील होती. दुकानं आणि इमारती यांच्यातील अंतरामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली.