ठाण्यात चुकीचे कोरोना रिपोर्ट देणाऱ्या प्रयोगशाळेवर बंदी, तर अव्वाच्या सव्वा बिल घेणाऱ्या रुग्णालयांना 16 लाखांचा दंड
कोरोना चाचणी देणाऱ्या खासगी प्रयोगशाळेने चुकीचे रिपोर्ट दिल्याने ठाणे महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली आहे (Action against Private Corona lab and Hospital).
ठाणे : कोरोना चाचणी देणाऱ्या खासगी प्रयोगशाळेने चुकीचे रिपोर्ट दिल्याने ठाणे महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली आहे (Action against Private Corona lab and Hospital). यात या प्रयोगशाळेवर ठाण्यात कोरोना चाचणी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच रुग्णांना कारण नसताना भीती दाखवून दाखल करणाऱ्या आणि अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणाऱ्या दोन खासगी रुग्णालयांना 16 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेने केलेली ही कारवाई राज्यातील बहुतेक पहिली कारवाई असल्याचं बोललं जात आहे.
मुंब्रा येथील कुटुंबातील एका सदस्याला किडनी विकाराचा त्रस्त होता. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते कोरोना पॉसिटिव्ह असल्याचं समोर आलं. यानंतर या कुटुंबातील 10 जण आणि शेजारी राहणाऱ्या 2 अशा एकूण 12 जणांची खासगी लॅबमध्ये चाचणी केली. त्यानंतर 6 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र, या लॅबकडून त्यांना रिपोर्ट देण्यात आला नाही. 12 जणांच्या चाचणीसाठी या खासगी प्रयोगशाळेने 36 हजार रुपये आकारले. तरीही रिपोर्ट देण्यात येत नसल्याने गुढ तयार झाले होते. यानंतर महापालिकेने या सर्व प्रकारानंतर त्यांना 10 दिवस क्वारंटाईन केले. या ठिकाणी देखील टेस्ट केल्यानंतर या 6 जणांची टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र, क्वारंटाईन सेंटरमध्ये देखील त्यांच्या हातात रिपोर्ट देण्यात आले नाही. यानंतर या कुटुंबीयांनी खासगी लॅब आणि खासगी हॉस्पिटलमध्ये साखळी असल्याचा आरोप केला. या कुटुंबाने आम्हाला न्याय देऊन आमचे पैसे परत मिळावे, अशी मागणी केली. तसेच अशा खासगी प्रयोगशाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
यानंतर ठाणे महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करुन या खासगी लॅबचे रिपोर्ट योग्य नसल्याचे सांगितले. तसेच या लॅबवर कारवाई करत त्यांच्यावर ठाण्यात कोरोना चाचणी करण्यावर बंदी घालण्यात आली. या प्रकरणातून ठाण्यात खासगी लॅबचे मोठे रॅकेट समोर आले आहे. संबंधित खासगी प्रयोगशाळा आयसीएमआरची अधिकृत प्रयोगशाळा होती. असं असतानाही या प्रयोगशाळेच्या कोव्हिड 19 च्या 6 स्वॅब तपासणीत चुकीचा अहवाल आढळला. त्यामुळे या लॅबला ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे.
? #Update
थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृतप्रयोगशाळेत कोव्हीड-१९ च्या स्वब तपासणीत ६ प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबलाठाण्यात कोव्हीड-१९ चे स्वॅबतपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश मा. महापालिका आयुक्त श्री विजय सिंघल यांनी दिला आहे.
— Thane Municipal Corporation – ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) May 22, 2020
ठाणे शहरात कोव्हिड – 19 ची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची कोव्हिड – 19 ची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते. संबंधित प्रयोगशाळा आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्या यादीमध्ये घोषित करण्यात आली होती. परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर प्रयोगशाळेने दिलेल्या 6 प्रकरणांमध्ये चुकीचा अहवाल असल्याचे आढळून आले. यामुळे अनेक रुग्णांना सामाजिक आणि मानसिक त्रासातून जावे लागले. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील संशयितांसाठी कोविड -19 स्वॅबगोळा करु नये, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. कोविड चाचणीबाबत असमाधानकारक सुविधा दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.
मनमानी कारभार करणाऱ्या दोन खासगी रुग्णालयांना 16 लाख रुपयांचा दंड
कोरोना काळात रुग्णांसोबत मनमानी वर्तन करणे ठाण्यातील 2 खासगी रुग्णालयांना चांगलेच भोवले आहे. अव्वाच्या सव्वा बील आकारण्यासह नाहक भीती दाखवून रुग्णांना दाखल केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने ठाण्यातील 2 खासगी रुग्णालयांना तब्बल 16 लाख रुपये दंड आकारला आहे. बहुदा, राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या या रुग्णालयाविरोधात तक्रारी आल्या होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील या 2 रुग्णालयांनी अनेकांना दाखल करुन घेतले. त्यांच्याकडून लाखोंची बीले आकारली. याबाबत तक्रारी आल्यावर ठाणे महापालिकेने चौकशी करुन ही कारवाई केली.
हेही वाचा :
हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन
निवृत्तीनंतर महिन्याभरात पायलटचा मृत्यू, कोरोनाच्या भीतीने 200 क्रू मेम्बर्स क्वारंटाईन
सोनू सूदवर ‘सामना’तील टीकेला भाजप-मनसेतून उत्तर, निरुपम यांच्याही कानपिचक्या
Action against Private Corona lab and Hospital