प्रवासाची अत्याधुनिक साधने उपलब्ध असूनही गोरगरीबांच्या ‘लालपरी’ ची लोकप्रियता अद्यापि कायम आहे. खेड्यापाड्यापर्यंत धावणाऱ्या एसटीने आता ‘टॉप गिअर’ टाकला असून ठाण्याची लालपरी राज्यात नंबर वन ठरली आहे. या लयभारी कामगिरीचे कौतुक होत असून मे महिन्यात ठाणे विभागाने तब्बल २२ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे, तर ५४ लाख ३८ हजार किलोमीटरचा प्रवास केला असून ४६० गाड्या रस्त्यांवर धावल्या. ही भरारी एसटीच्या कर्मचाऱ्यांनादेखील प्रेरणादायी ठरली आहे.
आधी कोरोना संकट व नंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेला राज्यव्यापी संप यामुळे बस आर्थिक गर्तेत अडकली होती. सुप्रीम कोर्टाने २२ एप्रिलपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आदेश दिले. सरकारही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे सर्व कर्मचारी रुजू झाले. ठाण्याच्या एसटी विभागात कार्यशाळा, चालक, वाहक तसेच प्रशासकीय कर्मचारी मिळून २ हजार ६९३ एवढे मनुष्यबळ आहे. त्यातच एसटीची संख्याही वाढली. पुन्हा नव्या जोमाने ठाण्याचा विभाग कामाला लागला. कर्मचाऱ्यांची मेहनत व योग्य नियोजन यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत एसटीच्या तिजोरीत अंदाजे २२ कोटी जमा झाले.
ठाणे एसटी विभागात ठाणे १, ठाणे २, कल्याण, मुरबाड, शहापूर, विठ्ठलवाडी, वाडा हे डेपो आहेत. संपूर्ण जिल्ह्यातून तसेच ठाण्यामधून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये एसटी धावते. उत्तर व पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातही एसटीचे मोठे जाळे पसरले आहे. त्याशिवाय ठाणे ते पुणे दर एक तासाला बसेस धावतात. त्यात शिवनेरी व शिवशाहीला प्रवाशांनी अधिक पसंती दिली आहे. एसटीचा संप मिटल्यानंतर फेऱ्यादेखील वाढल्या. त्यामुळे ठाण्याचा एसटी विभाग नंबर वनवर गेला आहे.
एसटीचे कर्मचारी, वाहनचालक यांनी मोठी मेहनत घेतली. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आखलेले अचूक वेळापत्रक आणि प्रवाशांची मानसिकता लक्षात घेऊन दिलेली सेवा यामुळेच ठाण्याचा एसटी विभाग आता सक्षम बनला आहे. ही भरारी यापुढेही सुरूच राहील.
■ विनोद भालेराव (नियंत्रक)