केडीएमसी आयुक्तांच्या बंगल्याचा रस्ता चर्चेत, 6 तासात 40 वाहनांचा अपघात, तर 8 जण किरकोळ जखमी
रस्त्यावर उघड्या चेंबरमुळे अपघात होत असल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता बंद केला. पालिका अधिकारीने तात्पुरती डागडुजी केली. मात्र पुन्हा चेंबर फुटल्याने एखाद्याचा जीव गेल्यानंतरच पालिका जागी होणार का? असा संतप्त सवाल करत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा आणखी एक ढिसाळ कारभार समोर आला आहे. कल्याणमध्ये उघड्या चेंबरमध्ये अनेक वाहनं पडून अपघात होत आहेत. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्याचा हा रस्ता असून याच रस्त्यावरून केडीएमसी आयुक्त स्वतः ये-जा करत असतात. केडीएमसी आयुक्तांचा बंगला ते काळा तलाव या दरम्यान दुर्गामाता रस्ता आहे. हा रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
या रस्त्यावर सकाळपासून उघड्या चेंबरमुळे सुमारे 40 ते 45 गाड्या या चेंबरमध्ये अडकल्या. तर 15 ते 20 बाईकस्वार या चेंबरमुळे पडले आहेत. यात 8 जण जखमी देखील झाले आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांनी मदत केली. त्यानंतर वारंवार याबाबत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना या अपघाताबाबत कळवण्यात आले. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर संतप्त नागरिकांकडून हा रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर झोपेत असलेले अधिकारी तिथे पोहचले. मात्र त्यांनी तात्पुरती या ठिकाणी डागडुजी केली. आता पुन्हा चेंबर फुटले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच पालिका जागी होणार का? असा संतप्त सवाल करत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला.